भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला नांदेडमध्ये हिंसक वळण लागले. हदगाव तालुक्यात एका विद्यार्थ्याचा पोलिसांच्या लाठीमारात मृत्यू झाला. तर वाळकीफाटा येथे दगडफेकीत कारमधून प्रवास करणारी चिमुकली जखमी झाली.

भीमा कोरेगावमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ आंबेडकरवादी संघटनांनी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली. नांदेडमध्येही बुधवारी सकाळपासून तणाव होता. बंदमुळे बहुतांश दुकानदारांनी दुकाने उघडलीच नाहीत. एस.टी. महामंडळानेही आपल्या बसेस आगारातच थांबवून ठेवल्या. बहुसंख्य पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत न पाठविणेच पसंत केले. शिवाजीनगर पोलिसांच्या हद्दीत आंदोलकांनी पोलीस वाहनावर दगडफेक केली. या दगडफेकीत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोविंद मुंडे, जमादार गणेश कानगुले, चालक शिवाजी मुंडे हे जखमी झाले. यापैकी गोविंद मुंडे यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

हिमायतनगरात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शीघ्र कृती दलाचे एक वाहन हदगावहून आष्टीमार्गे हिमायतनगरकडे जात असताना जमावाने जोरदार घोषणाबाजी करत पोलिसांचे वाहन अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाहनातील जवानांनी उतरुन लाठीमार सुरु केला. यात योगेश प्रल्हाद जाधव या दहावीत शिकणाऱ्या मुलाच्या मानेला फटका बसला. नाका-तोंडातून रक्तस्त्राव सुरु झाल्याने त्यास हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

तामसा पोलीस ठाण्यासमोरही जमावाने पोलीस वाहनांवर दगडफेक झाली. हिमायतनगरात दगडफेक व बॅनर्स फाडल्याने तणाव निर्माण झाला होता. माहूर तालुक्यातही कडकडीत बंद पाळण्यात आला. टी-पॉईंट जवळ टायर जाळून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. व्यापारी संघटनेने हिंसाचाराच्या निषेधार्थ दुकाने बंद ठेवली. संभाजी ब्रिगेड या संघटनेनेही आंदोलनाला पाठिंबा दिला होता. अफवांचे पेव फुटल्याने पोलिसांनी जिल्ह्यातील बंदोबस्त वाढवला आहे.

दरम्यान, आंबेडकरवादी संघटनांचे कार्यकर्ते सकाळी दहाच्या सुमारास आय.टी.आय. चौकातील महात्मा ज्योतीबा फुले पुतळ्याजवळ जमले. तिथून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना दिले. मंगळवारी जिल्हाधिकारी यांचे वाहन फोडल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्थानकात यशोनील मोगले, राहूल प्रधान, सुरेख चिखलीकर, रोहित पिंपळे, राहूल सोनसळे, विकी वाघमारे, श्याम कांबळे, बालाजी पंडित, राहूल चिखलीकर, उदय नरवाडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.