महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी एक जादूगार नियुक्त करण्यात आला आहे. सय्यद राजू नावाचा नागपूरहून आलेला हा जादूगार भाजपला मतदान दिले तर कानातून पाणी निघेल, असे सांगतो आणि हातचलाखीने एका नरसाळ्यातून पाणी काढून दाखवतो. जादूने भाजपचा रुमालही काढून दाखवतो. वेगवेगळ्या प्रकारच्या जादूच्या माध्यमाने केलेल्या या प्रचारकाला अजून तसे काम मिळाले नाही. मात्र, या पुढे सात दिवसांसाठी कोणी १५ हजार रुपये दिले तर त्यांचे काम करू, असे तो सांगतो.
 भाजप उमेदवारांसह कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात उमेदवारांची बैठक घेण्यात आली. त्यास दानवे अनुपस्थित होते. भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, प्रदेश संघटनमंत्री रवींद्र भुसारी, प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, आमदार अतुल सावे, माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत अति आत्मविश्वास दाखवू नका, जनतेच्या संपर्कात राहा, असा सल्ला यावेळी देण्यात आला. याच कार्यक्रमात सय्यद राजू याचेही जादूचे प्रयोग झाले. वॉर्डा-वॉर्डात हा जादूगार आता प्रयोग करेल. मात्र, त्याला भाजपने नियुक्त केलेले नाही. एखाद्याला वाटले तर तो त्याचा प्रचारात वापर करेल, असे सांगण्यात आले. सय्यद राजू प्रचारासाठी खास नागपूरहून औरंगाबाद येथे आला. प्रचार कार्यालयाच्या सुरक्षारक्षकाला भेटला. आज बैठकीच्या निमित्ताने त्याने त्याचे प्रयोग दाखवले.
 या बैठकीस शहराध्यक्ष बापू घडामोडे यांची मात्र अनुपस्थिती होती. ते स्वत:च रामनगर वॉर्डातून उमेदवार असल्याने गैरहजर राहिल्याची चर्चा होती. शहराध्यक्ष स्वत:च्या वॉर्डात अडकले असले तरी प्रचारावर परिणाम होत नाही, असेही यावेळी सांगण्यात आले. अधिकृत उमेदवारी दिल्यानंतरही साधना सुरडकर यांनी देवानगरी वॉर्डातून उमेदवारी अर्ज परत का घेतला? त्यांना पक्षाचा आदेश मान्य नव्हता तर त्यांच्यावर कारवाई करणार का, असे भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांना विचारले असता, त्यांची घरगुती अडचण होती आणि ती अर्ज दाखल केल्यानंतर सांगण्यात आली, असे ते म्हणाले.