पक्षविरोधकांना पक्षात प्रवेश देण्याचा सर्वस्वी अधिकार जिल्हाध्यक्षांना देण्याचा निर्णय भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी घेतला आहे. या नव्या निर्णयामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष आता अधिक वजनदार ठरण्याची चिन्हे आहेत.
 मुंबई दौऱ्यावर आले असताना पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची व पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत घेतली. या बैठकीत स्थानिक पातळीवर पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. या चर्चेतच मराठवाडय़ातील काही जिल्हाध्यक्षांनी त्यांना असलेल्या मर्यादित अधिकारांबाबत शंका उपस्थित केली. जिल्हाध्यक्षांना अंधारात ठेवून काही प्रदेश पदाधिकारी निर्णय घेतात. अन्य पक्षांतून भाजपत प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. असे काही आगंतुक प्रदेश किंवा संघटन पदाधिकाऱ्यांची मर्जी संपादन करून भाजपत दाखल होतात. अशा काही आगंतुकांनी या वेळच्या विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केले.

पक्ष-प्रवेच्छुकांची गुन्हेगारी पाश्र्वभूमी आहे अथवा नाही, हे तपासून भाजपेतर नेत्यास भाजपत प्रवेश दिला जाईल. जिल्हाध्यक्ष त्याबाबत निर्णय आता यापुढे घेणार आहेत.

-डॉ. शिरीष गोडे, भाजप जिल्हाध्यक्ष

मात्र ज्येष्ठ नेत्यांच्या आशीर्वादामुळे ते अद्याप पक्षातच आहेत. आता ते जिल्हाध्यक्षांनाही जुमानत नाहीत, पक्षाचे कार्यक्रम पाळत नाहीत, अशा स्वरूपाच्या तक्रारी जिल्हाध्यक्षांनी केल्या. त्यात लक्ष घालण्याचे आश्वासन अमित शहांनी दिले. जिल्हा पातळीवर पक्षसंघटना मजबूत करण्यास आपले प्राधान्य राहील. त्यामुळे यापुढे कोणत्याही जिल्ह्य़ातील नेत्यास भाजपत प्रवेश घ्यायचा असेल तर जिल्हाध्यक्षच त्याबाबत निर्णय घेईल, अशी स्पष्ट भूमिका शहा यांनी मांडली.
 यापूर्वी मुंबईतील नेत्यांशी संधान साधून प्रवेशाचा सोपस्कार होत असे किंवा राष्ट्रीय नेत्याच्या आगमनप्रसंगी पक्षप्रवेश घेणाऱ्यांची गर्दी वाढत असे. त्यामुळे अशा नेत्यांबाबत त्यांची पाश्र्वभूमी तपासली न जाण्याचाच प्रकार घडत होता. या नव्या निर्णयामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष अधिक वजनदार ठरण्याची चिन्हे आहेत.
प्रशांत देशमुख, वर्धा</strong>