|| सतीश कामत

राज्याच्या अन्य जिल्ह्य़ांप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्य़ात नुकत्याच पार पडलेल्या मुख्यमंत्री चषक कला-क्रीडा स्पर्धामध्ये जिल्हाभरातून सुमारे ६० हजारांपेक्षा जास्त युवक-युवतींना सहभागी करून घेत भाजपाचे स्थानिक संघटक दीर्घकाळानंतर तरुणाईपर्यंत पोचण्यात यशस्वी झाले आहेत.

भरपूर प्रसिद्धी आणि पैसा खर्च करून राज्यात सर्वत्र आयोजित या स्पर्धाचा उद्देश, युवा पिढीच्या सुप्त गुणांना वाव देणं वगैरे वगैरे असल्याचं भाजपा नेत्यांनी कितीही सांगितलं तरी लोकसभा-विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना कोणत्याही राजकीय पक्षाला युवा पिढीची आठवण का होते, याचं उत्तर सर्वज्ञात आहे. ते मान्य केलं की, स्वाभाविकपणे चर्चा होते की, कोणता पक्ष त्यामध्ये यशस्वी ठरला?  त्या दृष्टीने विचार केला तर गेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात अशा एखाद्या जिल्ह्यातीलच नव्हे, तर सबंध देशातील तरुण पिढीला आपल्याकडे आकर्षित करून घेण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी कमालीचे यशस्वी ठरले होते. किंबहुना तेच भाजपाच्या यशाचं मुख्य गमक होतं. पण गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. त्यामुळे या वर्गाला आपल्याकडे खेचण्यासाठी पक्षाच्या नेत्यांना नवीन काहीतरी क्लृप्त्या लढवणं गरजेचं होतं.  त्यातूनच सी एम चषक स्पर्धेचा जन्म झाला आणि रत्नागिरी जिल्ह्य़ापुरता तरी आयोजकांनी त्याचा पुरेपूर लाभ उठवला. या पक्षाची जिल्ह्य़ातील सध्याची दयनीय अवस्था लक्षात घेता ही कामगिरी कौतुकास्पद म्हणावी लागेल.

तसं पाहिलं तर एके काळी कै. तात्यासाहेब नातू, कुसुमताई अभ्यंकर, शिवाजीराव गोताड अशा मातबरांमुळे रत्नागिरी जिल्ह्य़ात भाजपाचा मोठा दबदबा होता. ग्रामीण भागातही वाडय़ा-वस्त्यांवर जनसंघ काळापासूनची काही तालेवार कुटुंबं पकड ठेवून होती. त्यानंतर १९९९ ते २००९ या काळात बाळ माने आणि डॉ. विनय नातू या आमदारद्वयांनी ही परंपरा पुढे चालवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. पण २००४ च्या विधानसभा निवडणुकीत माने आणि त्यानंतर २००९ च्या निवडणुकीत डॉ. नातू यांना पराभव पत्करावा लागल्यानंतर जिल्ह्य़ात भाजपाला इतकी उतरती कळा लागली की, त्याची तुलना तोळामासा प्रकृतीच्या काँग्रेस या दुसऱ्या राष्ट्रीय पक्षाशीच होऊ शकेल. या काळात माने यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने लढवलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही भाजपाला लक्षणीय यश मिळवता आलेलं नाही. चिपळूण किंवा देवरुखचं नगराध्यक्षपद या पक्षाकडे आलं असलं तरी त्याचं बरंचसं श्रेय पक्षापेक्षा संबंधित उमेदवारांच्या व्यक्तिगत प्रभावाला जातं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री चषक स्पध्रेसाठी पक्षाचे रत्नागिरी जिल्ह्य़ाचे पालक आमदार प्रसाद लाड, जिल्हा प्रवक्ता अ‍ॅडव्होकेट दीपक पटवर्धन, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सचिन वहाळकर आणि इतर स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी संघटितपणे प्रयत्न करून या विविध स्पर्धासाठी मिळवलेला तरुणाईचा प्रतिसाद नोंद घेण्यासारखा आहे.

क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो खो, कुस्ती इत्यादी खेळ आणि संगीत, नृत्य, चित्रकला, रांगोळी इत्यादी कला प्रकारांच्या झालेल्या या स्पर्धामध्ये साठ हजारापेक्षा जास्त युवा स्पर्धकांचा सहभाग, हा भाजपाची जिल्ह्य़ातली सध्याची अवस्था पाहता चमत्कारच म्हणावा लागेल, असा अनुभव आहे. त्यामध्ये जिल्ह्य़ाच्या ९ तालुक्यांपैकी पक्षाचं नगण्य अस्तित्व असलेल्या दापोली तालुक्यात सर्वात जास्त, सुमारे २१ हजार कलाकार-खेळाडूंनी भाग घेतला. त्या खालोखाल चिपळूण (१७ हजार) आणि रत्नागिरीचा (१५हजार) क्रमांक राहिला. लांजा-राजापूर-साखरपा पट्टय़ातूनही सुमारे आठ हजार युवकांनी सहभाग नोंदवला.

अर्थात अशा स्पर्धामध्ये भाग घेतला म्हणजे संबंधित युवक भाजपाच्या गळाला लागले, असं मुळीच नाही. किंबहुना यापैकी बहुसंख्य केवळ वेगळ्या प्रकारच्या स्पध्रेत भाग घेण्याची संधी आणि बक्षिसांच्या लयलुटीमुळेच त्याकडे आकर्षित झाले, याची जाणीव आयोजकांनाही आहे. पण जिल्ह्य़ातील इतक्या मोठय़ा संख्येच्या युवा शक्तीपर्यंत पोचण्याचं मूलभूत उद्दिष्ट साधण्यात ते निश्चितच यशस्वी झाले. शिवाय, या सर्व सहभागी स्पर्धकांचे नाव, पत्ते, मोबाइल क्रमांक इत्यादी भावी संपर्कासाठी उपयुक्त तपशीलही पक्षाला उपलब्ध झाला आहे.

या स्पध्रेच्या निमित्ताने भाजपाने खेडय़ापाडय़ातील खेळाडूंना मोठी संधी उपलब्ध करून दिली. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाभर स्पर्धकांची चांगली नोंदणी केली. इतक्या मोठय़ा संख्येने युवकांशी झालेला थेट संपर्क आणि त्यांच्या सहभागामुळे जिल्ह्य़ात भाजपा चांगल्या प्रकारे सक्रिय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. युवा पिढीला खेळण्याची संधी प्राप्त होण्याबरोबरच त्यांच्या वर्तुळात भाजपाची चर्चा सुरू झाली, हे या निमित्ताने पक्षाच्या नेते-कार्यकर्त्यांनी मिळवलेलं यश म्हणावं लागेल.    – अ‍ॅड. दीपक पटवर्धन, प्रवक्ता, जिल्हा भाजपा