News Flash

गडचिंचले प्रकरण : CBI मार्फत चौकशी करा; प्रविण दरेकर यांची मागणी

खरा सूत्रधार शोधण्यास पोलिसांना अपयश आल्याचंही ते म्हणाले.

“पालघर जिल्ह्यातील गडचिंचले प्रकरणाला २५ दिवस उलटले असले तरीही पोलिसांना यातील प्रमुख सूत्रधाराचा शोध घेण्यास अपयश आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात यावी,” अशी मागणी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. प्रवीण दरेकर, आमदार मनीषा चौधरी, आमदार सुनील राणे यांनी गाडचिंचले भागाचा दौरा केला. त्यानंतर ते बोलत होते. गडचिंचले प्रकरणानंतर आपण लगेचच घटनास्थळी जाण्याचा प्रयत्न केला असता प्रशासनाने आपल्याला रोखले असल्याचे दरेकर यांनी सांगितले. राज्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा अपेक्षित गतीने तपास होत नसल्याचा आरोप त्यांनी या दौऱ्यानंतर पालघर येथील पत्रकार केला.

“या हत्याकांडात जमावाने केलेला हल्ला चिथावणीतून झाला होता, विशिष्ट माथेफिरूनी हा कट रचला होता का? या साधू मंडळांची पोलिसांसमोर अमानुषपणे हत्या झाली असता त्यावेळी पोलिसांनी हवेत गोळीबार का केला नाही? पोलिसांना प्रथम मारहाण झाली असे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे, मग अशा मारहाणीची बाब जिल्हा मुख्यालयाला कळवण्यात दिरंगाई का केली?,” असे सवाल त्यांनी यावेळी केले. “एक तासाच्या अंतरावर असणाऱ्या या ठिकाणी पोलिसांना पोहोचण्यास पोलिसांना पाच तास लागले असे अनेक प्रश्न निरुत्तरित आहेत. या प्रकरणाची जलदगतीने चौकशी होणे आवश्यक आहे,” प्रवीण दरेकर यांनी नमूद केलं.

उशिरा दौरा करून काय साध्य झालं?

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या भागाचा उशिराने दौरा करून काय साध्य केले असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. पालघर पोलीस अधीक्षक यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याबाबत विचारले असता, “पोलिसांसोबत या घटनेला जिल्हा प्रशासनदेखील तितकेच जबाबदार असून सर्व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांकडून दोषी असलेल्या पोलीस सहकाऱ्यांची निःपक्ष पद्धतीने चौकशी होईल का याबाबत शंका उपस्थित करून हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सुपूर्द करण्याची मागणी प्रवीण दरेकर यांनी केली. या बाबतचे पत्र त्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केले. तसेच त्यांनी पालघरच्या प्रभारी पोलीस अधीक्षकांसोबत या घटनेसंदर्भात व सुरु असलेल्या चौकशी संदर्भात चर्चा केली.

पक्षाची भूमिका सर्वसमावेशक

विधानपरिषदेच्या तिकीटवाटप दरम्यान ज्येष्ठ नेत्यांना डावललं या बाबत प्रवीण दरेकर यांना विचारणा केली असता पक्षात ज्येष्ठ मंडळींचा सन्मान कायम असल्याचे सांगितले. पक्षाची भूमिका सर्वसमावेशक असल्याचेही त्यांनी नमूद केले. नव्या- जुन्यांचा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न केला जात असून पक्षांच्या ध्येयधोरण अनुसार तिकीट वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 6:21 pm

Web Title: bjp leader pravin darekar demands cbi inquiry palghar gadchincle mob lynching case jud 87
Next Stories
1 शहापूरमध्ये ५ जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह; एकूण संख्या १६ वर
2 राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकून पडलेल्या लोकांसाठी सोमवारपासून मोफत एसटी सेवा
3 “…म्हणून अंत्यविधीला २० जणांना तर दारुच्या दुकानासमोर हजारोंना परवानगी” : संजय राऊत
Just Now!
X