जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणुची लागण झालेले पाच रुग्ण महाराष्ट्रात अढळून आल्याने एकच खळबळ उडली आहे. पुण्यामध्ये या विषाणूची लागण झालेले पाच रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वतः दिली आहे. या पार्श्वभूमीवर आता पुणे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून प्रशासनाकडून वेगवेगळे उपाय राबवले जात असतानाच एका भाजपा नेत्याने चक्क तपकिर ओढल्याने करोना विषाणू पासून बचाव होऊ शकतो असा अजब दावा केला आहे.

श्रीगोंद्यातील भाजपाचे नेते आणि येथील नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी तपकीर ओढणे हा करोनावरील जालीम उपाय असल्याचा दावा केला आहे. त्यांनी यासंदर्भातील एक व्हिडिओ क्लिप आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन शेअर केली आहे.

काय दावा केला आहे नागवडे यांनी

नागवडे यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये जुन्या काळात तपकीर ओढली जायची असं सांगत तपकीरीचा वापर करोनावर मात करण्यासाठी करता येऊ शकतो असं म्हटलं आहे. “जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात करोना विषाणूचा फैलाव झाला आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणात भितीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टर, आयुर्वेदिक डॉक्टर या सर्वांना एक नम्र विनंती करुन आवाहन करत आहे. पूर्वीच्या काळामध्ये पुरुष आणि स्त्रिया तपकीर ओढायचे. तपकीरीमध्ये विशिष्ट प्रकारचा उग्र वास असतो. त्या वासामुळे कुठल्याही प्रकारचा जिवाणू किंवा विषाणू आपल्याला धोकादायक ठरत नाही. त्यामुळे आपण सर्वांना यावर निश्चित विचार केला पाहिजे. ज्याला करोना विषाणुची बाधा झालेली आहे त्या सर्वांना तपकिरीचा काही उपयोग होऊ शकतो का याचा विचार करायला हवा. ज्यांना हा रोग होतोय त्यांना तपकिर दिल्यास त्यापासून त्यांचा बचाव होऊ शकतो का हे आपण सर्वांना तपासलं पाहिजे. यावर सर्व तज्ज्ञांनी आणि डॉक्टरांनी आपले मनोगत नोंदवून यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेतल्यास फायद्याचं ठरेल,” असं मत या व्हिडिओमध्ये नागवडे यांनी व्यक्त केलं आहे.

हो क्लिप माझीच

ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर एका मराठी वेबसाईटशी बोलताना नागवडे यांनी ही क्लिप आपलीच असल्याची कबुली दिली आहे. तसेच तपकीरीचा उग्र वास खरोखरच करोना विषाणू नष्ट करण्यासाठी फायद्याचा ठरु शकतो असा विश्वास नागवडे यांनी व्यक्त केला आहे.