भारतीय जनता पक्षात केवळ आमदार आणि केंद्रीय नेतृत्व ठरवतं तेच मुख्यमंत्री होतात, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. “जर पक्षाने संधी दिली की तर मुख्यमंत्रीपद सोडणार नाही”, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच केले होते.

फडणवीस म्हणाले, चंद्रकांतदादांनी नेमकं काय वक्तव्य केलं आहे याची मला माहिती नाही. त्यांची आणि माझी भेटही झालेली नाही, नाहीतर मी त्यांना याबाबत विचारल असतं. पण भारतीय जनता पक्षामध्ये आमचे आमदार आणि केंद्रीय नेतृत्व जे ठरवतं तेच मुख्यमंत्री होतात. त्यामुळे पक्षामध्ये योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जातात. आज मी मुख्यमंत्री आहे आणि भविष्यातही होईल, अशा शब्दांत त्यांनी पुन्हा सत्तेत आल्यास आपणच मुख्यमंत्री असू असे सूचक विधान केले. तसेच चंद्रकांतदादा आत्ताच पक्षाचे नवे अध्यक्ष झालेत त्यामुळे त्यांना कशाला मध्ये आणताय, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी पत्रकारंना हाणला.

दरम्यान, ‘मी पुन्हा येईन’ या टॅग लाईनने मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेला सुरु केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत आल्यास तुम्हीच जर पुन्हा मुख्यमंत्री होणार असाल तर आदित्य ठाकरे तुमच्या कॅबिनेटमध्ये असतील का? या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, आदित्य ठाकरेंबाबत त्यांचा पक्ष काय ते ठरवेल मी हे ठरवू शकत नाही.

इतके निराश विरोधीपक्ष राज्याच्या इतिहासात कधीही पाहिले नाहीत : मुख्यमंत्री

एकीकडे आम्ही नागरिकांशी, मतदारांशी संवाद करतोय तर विरोधी पक्ष ईव्हीएमशी संवाद करताहेत. विरोधी पक्षाला हे लक्षात आलं नाही की ईव्हीएम ही एक मशीन आहे ती मतं देत नाही, मतं तर मतदार देतात त्यामुळे त्यांच्याशी संवाद केला त्यांच्या विश्वासाला पात्र झालो तरच मतं मिळतात. त्यामुळे अतिशय निराश, अतिशय हताश पूर्णपणे भरकटलेला आणि मुद्द्यांपासून दूर गेलेला अशा प्रकारचा विरोधीपक्ष महाराष्ट्राच्या इतिहासात आम्ही कधीही पाहिलेला नाही.