राज्यात एकीकडे करोनाने कहर केलेला असताना राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे. ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकावर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर भाजपा नेत्यांनी संताप व्यक्त केला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान आमदार गोपीचंद प़डळकर यांनी आपल्या अकार्यक्षमतेवर पांघरूण घालण्यासाठी ते भाजपावर बेछूट आरोप करत असल्याची टीका केली आहे.

राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते पोलीस ठाण्यात का गेले?; नवाब मलिकांकडून गंभीर आरोप

“नवाब मलिक ज्या गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तिथे काल एकाच दिवसात ॲाक्सिजन अभावी १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या रुग्णांच्या नातेवाईकांना आधार देण्याऐवजी, स्वत;चं पाप झाकण्यासाठी आपल्या अकार्यक्षमेतवर पांघरूण घालण्यासाठी ते भाजपावर बेछूट आरोप करत आहेत. पण हा महाराष्ट्र आहे. नवाबभाई ये पब्लिक है सब जानती है…,” असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

“आरोग्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेण्याऐवजी बघ्याची भूमिका घेत हात झटकले आहेत. ॲाक्सिजनअभावी महाराष्ट्रात एक पण मृत्यू झाले नाहीत असं वक्तव्य केलं आहे. ही कोणती संवेदनशीलता?,” अशी विचारणा गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

“मागच्या दीड वर्षांपासून पहिल्या फळीतील अथक परिश्रम घेणाऱ्या आरोग्य कर्मचारी व डॅाक्टरांशी सरकारला साधा संवादही करावासा वाटत नाही. त्यांच्याशी चर्चाही करत नाही. कालच मला कळाले आरोग्य कर्मचारी व डॅाक्टर संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. सगळ्या गोष्टी जनतेकडून अपेक्षित आहेत, पण सरकारचा कसलाही ॲक्शन प्लान नाही. या सरकारने बेशरमपणाचा कळस गाठला आहे,” अशी टीका त्यांनी केली आहे.

पुढे ते म्हणाले की, “नरेद्र मोदींनी औषधांचा साठा करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले असून किंमती कमी केल्या आहेत. अशा संकटाच्या काळात जे उद्योजक महाराष्ट्रात रेमडेसिविरचा पुरवठा करण्यासाठी स्वत: पुढाकार घेत आहेत त्यांच्यावर पोलिसांच्या माध्यमातून कारवाई करण्याची योजना राज्य सराकारने आखली आहे. यातून आपला काय हेतू आहे हे दिसत आहे”.

“असं वाटतं की, राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणेंवर आता शंभर कोटीचं वसुलीची जबाबदारी किंवा टार्गेट दिलं आहे. महाराष्ट्र सरकार अपयशी ठरलं आहे म्हणून भाजपावर आरोप करत आहे,” असंही ते म्हणाले आहेत.