भाजपा नेते आणि त्यांची वादग्रस्त वक्तव्यं हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. भाजपा नेत्यांच्या या यादीत आता अजून एक नाव समाविष्ट झालं आहे ते म्हणजे खासदार शरद बनसोडे यांचं. एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. आपल्यावर बेतलेला एक प्रसंग सांगताना गुप्तांगाचा उल्लेख करत त्यांनी किस्सा सांगण्यास सुरुवात केली. यावेळी कार्यक्रमस्थळी महिला आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित असल्याचंही भान त्यांना नव्हतं. महत्त्वाचं म्हणजे यावेळी व्यासपीठावर माजी खासदार सुशीलकुमार शिंदेदेखील उपस्थित होते. सोलापूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

काय बोलले शरद बनसोडे –
मी तुम्हाला माझा स्वानुभव सांगतो. मी लहानपणी आठवी-नववीत असताना एकदा झाडावरुन पडलो. त्यामुळे माझे गुप्तांगच सरकले. माझे वडिल मला दवाखान्यात घेऊन गेले तेव्हा डॉक्टरांनी मला चड्डी काढण्यास सांगितलं. मग काय माझी पंचाईतच झाली. मी वडिलांकडे बघितलं तर त्यांनी डॉक्टरांना बघून घ्या सांगत तिथून निघून गेले. डॉक्टरांनी एका बाजूला पकडून जोरात हिसका मारला आणि मी बेशुद्ध पडलो. त्यानंतर त्रास कमी झाला. तेव्हापासून औषध नाही की काही नाही…

न्यूज १८ लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, शरद बनसोडे मर्यादा ओलांडत असल्याचं लक्षात येताच गावातील नागरिक आणि महिलांनी त्यांचे भांषण थांबवले. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार शरद बनसोडे यांच्या गावातच घडला आहे.