पैसा व ईव्हीएम मशिन या दोघांच्या बळावरच भारतीय जनता पार्टी निवडणुका जिंकत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना औरंगाबादमध्ये जाहीर सभेत बोलताना ज्यांच्याकडे स्वत:चे उमेदवार नाहीत ते निवडणुका कसे जिंकतात असा प्रश्न उपस्थित करून केवळ पैसा आणि ईव्हीएम मशिन्सच्या जोरावर भाजपा जिंकत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ईव्हीएम मशिन्स फॉल्टी आहेत हे मी पहिल्यापासून सांगत असल्याचे राज ठाकरे म्हणाले. “मी सगळ्या राजकीय पक्षांना पत्र लिहिली आहेत. निवडणूक आयोगाकडे जुनी कागदावर शिक्के मारण्याची पद्धत पुन्हा सुरू करावी अशी मागणी करण्याचे आवाहन केले आहे. जर मतदानाची जुनी पद्धत आली तर लगेच कळेल भाजपाचे उमेदवार जिंकतात की हारतात,” राज म्हणाले.

त्रिपुरामध्ये भाजपाची सत्ता आली परंतु त्यांचे 90 टक्क्यांपेक्षा जास्त उमेदवार काँग्रेस व तृणमूल काँग्रेसमधून आणलेले आहेत असे सांगत पैशाच्या जीवावर भाजपा जिंकत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. नरेंद्र मोदींपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत भाजपाच्या नेत्यांवर यथेच्छ तोंडसुख घेताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान होण्यापूर्वी असलेले मोदी आता मात्र संपूर्णपणे बदलले असल्याचे सांगितले. भाजपाचं सरकार अत्यंत खोटं बोलणारं असून आत्तापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत मी इतकं खोटं बोलणारं सरकार बघितलं नाही असं सांगत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचं परवडलं असं ते म्हणाले.