दिल्लीत लागलेल्या निकालाचं आश्चर्य वाटलं नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. मोदी आणि अमित शाह यांच्या अहंकाराला लोक कंटाळले आहेत. झारखंडमध्येही असाच कौल मिळाला, मध्यप्रदेश, छत्तीसगढलाही हेच झालं. भाजपाच्या पराभवाची सुरु झालेली मालिका कुठे थांबेल असं वाटत नाही. लोकांना स्थिर आणि विकासाला चालना देणारं सरकार हवं आहे. त्या दृष्टीने प्रयत्न होणं आवश्यक आहे असंही शरद पवार म्हणाले. धार्मिक भावना चेतवून दोन समाजांमध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपाने केला. भाजपाने दिल्लीत धार्मिक कटुता कशी निर्माण होईल याचीही काळजी घेतली. ‘गोळी मारा’ सारख्या घोषणा झाल्या. त्या सगळ्याला जनतेने योग्य ते उत्तर दिलं आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदनही शरद पवार यांनी केलं आहे. पुण्यातल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी हे भाष्य केलं आहे.

महाराष्ट्रात जो प्रयोग झाला तो अनेक राज्यांमध्ये होऊ शकतो. तसं झाल्यास भाजपा दूर फेकला जाईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. भाजपा हा पक्ष देशावरची आपत्ती आहे. ही आपत्ती दूर करायची असेल तर वेगळे प्रयोग झाले पाहिजेत. किमान समान कार्यक्रमांवर विविध पक्षांनी एकत्र यायला हवं असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात झालेला महाविकास आघाडीचा प्रयोग हा अनेकांना पसंत पडला आहे. भाजपासारख्या शक्तींना दूर ठेवायचं असेल तर त्यांच्याविरोधात इतर पक्षांनी एकत्र यायला हवं असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. दिल्लीतली निवडणूक ही मुख्यत्वे करुन भाजपा आणि आप या दोन पक्षांमध्येच होती असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. सध्या देशामध्ये पर्यायी शक्ती या राज्यांमध्ये जागृत झाल्या आहेत. महाराष्ट्रात वेगळा प्रयोग झाला, पंजाबमध्ये वेगळी स्थिती आहे. भाजपाला पर्याय देणारे सगळे पक्ष एकवटले आहेत असं दिसून येतं आहे. हे पक्ष एकोप्याने राहिले तर भाजपाला हटवणं अगदीच सोपं आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.