रत्नागिरीत लोटे एमआयडीसीमधील घरडा केमिकल कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. शनिवारी सकाळी झालेल्या स्फोटामध्ये चार कामगार मृत्युमुखी पडले. आगीत गंभीररित्या भाजल्यामुळे त्यांना उपचारासाठी नेलं जात असतानाच मृत्यू झाला. तर एक जण जखमी आहे. दरम्यान आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आगाची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका मागवण्यात आल्या आहेत. लोटे अग्निशमन केंद्राच्या दोन गाड्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अपघातातील मृत आणि जखमींची नावे अद्याप समजलेली नाहीत.

स्थानिक आमदार योगेश कदम यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. तसंच गेल्या वर्षभरातील लोटे एमआयडीसीमधील ही पाचवी ते सहावी घटना असून तिथे पाहणी करणं गरजेचं असल्याचं मत योगेश कदम यांनी व्यक्त केलं आहे. भविष्यात यासंबंधी बैठक होण्यासाठी आपण प्रयत्न करु असंही त्यांनी सांगितलं आहे.