सध्या राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. राज्यातील सर्व माध्यमांनी ही प्रकरणं चांगलीच उचलून धरली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी चौकशी समिती नेमण्याचे सोपस्कार पूर्ण केले. आता ही समिती आपले काम चोख बजावेल याविषयी कोणाच्याच मनात शंका नाही. जाऊ दे तो आपला विषय नाही. आता होतंय असं की, गेल्या काही महिन्यांपासून सोलापुरातील लोकमंगल या खासगी साखर कारखान्याने शेतकरी, शेतमजूरांच्या नावाने परस्पर कर्ज उचलल्याची काही प्रकरणं समोर आली आहेत. योगायोग असा की हा समूह आपले कर्तव्यनिष्ठ भाजप नेते व सहकार मंत्री सुभाष देशमुख (बापू) यांचा आहे.

गेल्या आठवड्यात एका ऊसतोड मजुराला त्याच्यावर १५ लाखांचं कर्ज थकीत असल्याची  एका राष्ट्रीयकृत बँकेची नोटीस आली. ज्या शेतकऱ्याने कर्ज घेतलंच नाही, त्याची नोटीस त्याला आली. हे कर्ज ‘लोकमंगल’ने परस्पर घेतलं होतं. माध्यमांमध्ये हे वृत्त येताच समूहाने लगेचच त्याची थकीत रक्कम भरली. पण हे एकच प्रकरण नाही. अशी अनेक प्रकरणं सध्या बाहेर येत आहेत. काहींना याप्रकरणी धमकावलं जात असल्याचंही बोललं जातं. यापूर्वीही या समूहाविरूद्ध अशा प्रकारच्या तक्रारी आल्या होत्या. त्याहीवेळेस थोडाफार असा गोंधळ झाला होता. पण तेवढ्यापुरतंच. मुद्दा असा की, सर्वसामान्यांना कर्ज घेताना बँकांच्या अटी पूर्ण करताना नाकीनऊ येते. कुठून सुचलं आणि कर्जासाठी अर्ज केला, अशी साहजिक प्रतिक्रिया सर्वसामान्यांच्या तोंडून आपसूकच येते. या प्रकरणात जरा वेगळं घडतंय.. घडलंय. एखाद्याच्या नावाने कर्ज घेतले जाते. त्याची कागदपत्रं परस्पर जमा केली जातात. याची तीळमात्र कल्पना त्या शेतकऱ्याला नसते (व्हेरिफिकेशन नावाची प्रक्रियाही होत असते म्हणे बँकेत). विशेष म्हणजे हे कर्ज काही हजारांत नव्हे तर लाखांत होते. खूप सहजपणे ही प्रक्रिया झाली असं एकंदर दिसून येते. या संपूर्ण प्रकरणात बँकांच्या भूमिकेचं काय? त्यांनी ही तत्परता सर्वसामान्यांच्या कर्जाबाबत दाखवली तर…असो..तो आणखी वेगळा विषय होईल..

..सांगायचा मुद्दा हा की ‘लोकमंगल’ने आपला व्याप चांगलाच वाढवलाय. सोलापूर, उस्मानाबाद, पुणे आणि इतर जिल्ह्यांबरोबरच परराज्यातही थोडंफार जाळं विणलं आहे.  ‘लोकमंगल’च्या जोरावरच मागील लोकसभा निवडणुकीत उस्मानाबाद मतदारसंघातून मंत्रिमहोदयांच्या चिरंजीवांनी शिवसेनेबरोबर युती असतानाही बंडखोरी करत निवडणूक लढवली. त्यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेचे नुकसान झाले नसले तरी उपद्रवमूल्य मात्र जाणवले. आता त्यांचे चिरंजीव पुन्हा भाजपात सक्रीय आहेत. तर सांगण्याचा मुद्दा ‘लोकमंगल’चा आहे.. असो..

कंत्राटदार, आमदार, खासदार, नामदार अशी देशमुखांची राजकारणात प्रगती झाली आहे. आज चांगले प्रस्थ त्यांनी निर्माण केलंय. राज्यात कॅबिनेट मंत्री आहेत. पण त्यांच्याच कारखान्याकडून अशा पद्धतीने परस्पर कर्ज उचलण्याची प्रकरणं समोर येणे सत्ताधाऱ्यांना शोभत नाही. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणावर ते पाहतो, माहिती घेतो, सांगतो अशी उत्तरं देतात. अशावेळेस ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ हे पक्षनेतृत्वाचे वचन उगाचच डोळ्यासमोर तरळते.. इतकं असूनही त्यांच्या कार्यक्षमतेवर कोणाचीच शंका नाही..

दरम्यान, लोकमंगल अ‍ॅग्रो कंपनीने यापूर्वी उस्मानाबादप्रमाणे सोलापूर जिल्ह्य़ातील हजारो शेतकऱ्यांच्या नावावर एका बँकेकडून सुमारे ४० कोटींचे कर्ज उचलले होते, अशी माहिती पुढे आली होती. या कर्जप्रकरणाची कबुली स्वत: सुभाष देशमुख यांनी दिल्याचे वृत्तही माध्यमांत आले होते. कर्ज घेतलेले असले तरी त्यात फसवणूक किंवा भ्रष्टाचाराचा प्रकार नसल्याचा दावा ते करतात. तथापि, अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या नावे परस्पर बँकेकडून कर्ज उचलणे हे कितपत योग्य आहे, हे कोणत्या नैतिकतेत बसते, असे सवाल उपस्थित होतात

भंडारकवठे (ता. दक्षिण सोलापूर)  येथील लोकमंगल साखर कारखान्याने ऊस वाहतूकीच्या करारासाठी वाहनधारक शेतकऱ्यांनी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करुन कँनरा बँकेकडून परस्पर लाखो रुपयांचे कर्ज उचलले. येळेगाव येथील कल्याणराव बेळप्पा मेंडगुदले या शेतकऱ्याने फायनान्सचे कर्ज घेण्यासाठी सिबिल रिपोर्ट काढल्यानंतर त्याच्या नावे लोकमंगल कारखान्याने १५ लाखांचे कर्ज उचलल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे २०१५ मध्ये या शेतकऱ्याच्या नावे १५ लाख रुपयांचे कर्ज उचलल्याची खबरही कारखान्याने त्यास लागू दिली नाही. मात्र, त्याने याविषयी जाब विचारताच कारखान्याने एका दिवसात कर्जाचे १७ लाख ३४ हजार रुपये भरले.

मेंडगुदले यांनी २०१५ मध्ये ऊस वाहतूकदार म्हणून ट्रॅक्टरचा करार करण्यासाठी कारखान्याकडे स्टँप पेपर, कोरे धनादेश व इतर कागदपत्रे दिली. त्यांचा करार करुन घेतला नाही, शिवाय दिलेली कागदपत्रेही परत दिली नाहीत. मात्र, याच कागदपत्रांच्या आधारे मेंडगुदले यांच्या नावे बनावट स्वाक्षऱ्या करुन कँनरा बँकेच्या चाटी गल्ली शाखेत खाते उघडले. त्यांच्या नावे एक गुंठाही जमीन नसताना बँकेने ३१ डिसेंबर २०१५ रोजी १५ लाखांचे कृषी कर्ज मंजूर केले

गेल्या आठवड्यात बीबीदारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथील जैनुद्दीन बाशु शेख नावाच्या एका शेतकऱ्याला देना बँकेची थकीत कर्जासाठी नोटीस आली. नोटिशीत त्याने १५ लाखांचे कर्ज घेतले असून थकीत ७५८४८७ रूपये व व्याज बाकी असल्याचे सांगितले होते. या शेतकऱ्याने या बँकेचे कर्ज घेतलेच नव्हते. बीबीदारफळ येथील लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्रीजने शेख यांच्या नावाने परस्पर हे कर्ज उचलले होते. तर दुसरीकडे अशाच प्रकरणात फसवणूक झालेल्या बार्शी तालुक्यातील इंदापूरच्या महादेव मस्के या ऊसतोड मजुराला तक्रार न देण्यासाठी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

महादेव मस्के या पीडित ऊसतोड मजुराने यासंदर्भात बार्शीच्या तहसीलदारांना व पोलिसांना दिलेल्या निवेदनात लोकमंगल साखर कारखान्याच्या हस्तकांनी आपणास ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी लोकमंगल साखर कारखाना व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेताना देशमुख यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याच्या मागणीसह त्यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी केली आहे. ही सर्व उदाहरणे वानगीदाखल आहेत. अनेकजण तर तक्रार देण्यासाठीही पुढे आलेले नाहीत.

सोलापूर महापालिकेतही गोंधळ
आणखी एक मुद्दा म्हणजे, सोलापूर महानगरपालिकेत पहिल्यादांच भाजपची सत्ता आली आहे. शहरात सुभाष देशमुखांबरोबर राज्यमंत्री विजय देशमुख यांचा गट ही आहे. पण मिळालेल्या सत्तेचा विचका कसा करायचा हे पालिकेतील चित्र पाहिल्यानंतर मिळते. अनेक आश्वासनं देऊन सत्तेवर आलेल्या भाजपला आता कारभार करणं अवघड चाललं आहे. दोन देशमुखांच्या संघर्षात विकासाचे तीन तेरा वाजत असल्याचे दिसते.

एक आठवण..
काही वर्षांपूर्वी सुभाष देशमुख हे भाजप सोडण्याच्या मार्गावर असल्याचे वृत्त माध्यमांत येत होते. त्यांचा पक्षातील सक्रीय सहभागही कमी झाला होता. पण राजकारणात रोज बदल होत असतात म्हणे. पण असं काही झालं नाही. या अफवाच ठरल्या. आज ते भाजपतील एक बलाढ्य नेते आहेत. मंत्रिमंडळात महत्वाचे खाते त्यांच्याकडे आहे. अनेक समित्यांचं नेतृत्व ते करतात. जिल्ह्यात स्वत:चा एक गट निर्माण केला आहे. त्यामुळे भूतकाळात आता डोकावून पाहण्याची गरज नाही

सत्तरच्या दशकात पिंजरा नावाचा श्रीराम लागू अभिनीत व व्ही. शांताराम दिग्दर्शित सिनेमा आला होता. अत्यंत गाजलेल्या या चित्रपटाने एका संस्कारी मास्तराची झालेली वाताहत दाखवली होती. यातील ‘अहो कारभारी.. गावात होईन शोभा.. हे वागणं बरं नव्ह…’ हे गाणं खूप गाजलं होतं. कदाचित हे गाण सध्याच्या परिस्थितीला चपखल बसत असावं..

 

  • दिग्विजय जिरगे
    digvijay.jirage@loksatta.com