सीईओंच्या बनावट सहय़ा करून बदलीचे बनावट आदेश काढल्याबाबत आतापर्यंत २०जणांवर निलंबनाची कारवाई करणाऱ्या शिक्षण विभागाने आणखी ३० शिक्षकांवर कारवाईची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे आणखी काही जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
जि.प.च्या शिक्षण विभागातील अनागोंदीला काही पदाधिकाऱ्यांचा वरदहस्त होता. जि.प.चे तत्कालीन अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या स्वीय सहायकांनी तर संपूर्ण जि.प. आपल्या मालकीची असल्याच्या आविर्भावात काम केले होते. वास्तविक, या स्वीय सहायकांच्या तक्रारी त्याच वेळी वरिष्ठांकडे करण्यात आल्या होत्या. परंतु बेटमोगरेकर यांच्यापुढे वरिष्ठ अधिकारी हतबल ठरले. बदल्या असो, निधीचे वाटप असो, यात अध्यक्षांची मनमानी इतकी वाढली की काही सदस्यांनी थेट काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्याकडेही तक्रारी केल्या. जि.प.च्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या चव्हाण यांनी जाहीर कार्यक्रमात बेटमोगरेकरांना सबुरीचा सल्लाही दिला.
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत भांगे यांची बदली झाल्यानंतर शिक्षण विभागातील काहींनी नामी शक्कल लढवली व एकाच जावक क्रमांकाच्या आधारावर भांगे यांच्या बनावट सहय़ा करून बदलीचे बनावट आदेश तयार केले. आपले कोणीही काही वाईट करू शकत नाही, अशा आविर्भावात काही स्वीय सहायक होते. मात्र, हा गंभीर प्रकार लक्षात आल्यानंतर सर्व दबाव झुगारून मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी संबंधित दोषींवर कठोर कारवाईची शिफारस केली. सुमारे २० दिवसांपूर्वी या प्रकरणाची संचिका निकाली काढताना त्यांनी संबंधितांना निलंबित करावे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत व विभागीय चौकशी प्रस्तावित करावी, असे निर्देश दिले खरे. परंतु शिक्षण विभागाने केवळ २०जणांवर निलंबनाचीच कारवाई केली. त्यांनी उघडपणे बनावट सहय़ा करून बनावट आदेश काढले, अशांना शिक्षण विभाग का अभय देत आहे? असा प्रश्न सर्वसामान्य शिक्षकांना पडला आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कठोर कारवाईचे निर्देश दिले. २०जणांवर निलंबनाची कारवाई झाली असली, तरी आणखी ३०जणांच्या बनावट सहीच्या आधारे बदल्या झाल्या आहेत. आता या शिक्षकांवरही निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, मुख्य कार्यकारीअधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले असले, तरी शिक्षण विभागातील अधिकारी मात्र अजूनही राजकीय दबावामुळे संभ्रमात आहेत. मांजराच्या गळय़ात घंटा कोणी बांधायची, असे म्हणत सर्वच अधिकारी जबाबदारी झटकत आहेत. शिक्षकांवर कारवाई केल्यानंतर आता काही सदस्यांनी अभिमन्यू काळे यांच्यावरच अविश्वास आणण्याच्या दृष्टीने खटपट सुरू केली आहे. प्रामाणिकपणाने कर्तव्य बजावणाऱ्या काळे यांच्याविरुद्ध ठराव आणण्याचा प्रयत्न केल्यास काही सामाजिक संघटना न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याच्या तयारीत आहेत.