प्रत्येक वेळी बीअरसाठी उत्पादकांनी नवीन बाटली वापरावी, या नियमाचे काटेकोर पालन राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत अचानक कडक करण्यात आल्याने गेल्या काही दिवसांपासून ‘बीअर अधिक व बाटल्या कमी’ असे चित्र निर्माण झाले आहे! प्रत्येक बहुराष्ट्रीय बीअर कंपनीच्या काचेच्या बाटलीवर त्याचे बोधचिन्ह असते. एकमेकांच्या बाटल्या वापरता येत नाहीत, तसा नियमही आहे. गेल्या काही दिवसांपासून नवीन बाटली वापरावी, यासाठी उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी नोटिसा बजावणे सुरू केले आहे. परिणामी, औरंगाबादमधील काही बीअर उद्योग आठवडय़ातून दोनदोन दिवस बंद ठेवले जात आहेत.
बीअरची रिकामी बाटली उद्योजकांना साधारण १३ रुपयांना मिळते. नाशिक व हैदराबाद येथून उत्पादक बाटल्या विकत आणतात. पूर्वी एकच बाटली सात ते आठ वेळा भरली जात असे. बाटली धुऊन, र्निजतुकीकरण करून वापरली जाई. मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाने २३ एप्रिलला पत्र लिहून प्रत्येक वेळी नवीन बाटली वापरण्याच्या सूचना बीअर कंपन्यांना दिल्या. तत्पूर्वी या नियमांचा फारसा बाऊ होत नसे. मात्र, एका कंपनीच्या बोधचिन्हाच्या बाटल्या दुसऱ्याच कंपनीने वापरल्याने न्यायालयीन वाद निर्माण झाला. या वादातून जुन्या बाटल्या वापरता येणार नाहीत, असा निर्णय दिला गेला. त्यामुळे प्रत्येक कंपनीला स्वत:ची बाटली बनवून घेणे भाग पडले. ज्यांनी ही प्रक्रिया पूर्वीच पार पाडली होती, अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांना सध्या फारशी अडचण जाणवत नाही. मात्र, काही कंपन्यांना बाटल्या वेळेवर मिळत नसल्यामुळे बीअर तयार आहे, पण ती विकता येत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. नव्याने बाटलीची किंमत वाढल्याने येत्या काही दिवसांत बीअरच्याही किमती वाढू शकतात, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. या अनुषंगाने ब्रेव्हरीज असोसिएशनच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनाही बाटल्या धुऊन वापरण्याविषयीची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
औरंगाबाद जिल्हय़ात सहा बीअर उत्पादक कंपन्या आहेत. यातील बहुतांश बहुराष्ट्रीय आहेत. त्यांनी उत्पादित केलेला माल अन्य राज्यांत जातो. महाराष्ट्राव्यतिरिक्त अन्य ठिकाणी प्रत्येक उत्पादित बीअरसाठी नवीन बाटलीचा नियम नाही. त्यामुळे एकदा वापरलेली बाटली अन्य राज्यांत पुन्हा वापरली जाते. बीअरची रिकामी बाटली भंगारवाल्यामार्फत पुन्हा कंपनीत येते. ती स्वच्छ केल्यावर पुन्हा वापरली जाते, मात्र मे महिन्यापासून यावर र्निबध आले आहेत. केवळ नवीन बाटल्याच नाहीतर जुन्या बाटल्यांचे साठेही कंपनीच्या परिसरात ठेवू नका, अशा सूचना राज्य उत्पादन शुल्कच्या निरीक्षकांनी कंपन्यांना दिल्या आहेत. परिणामी जेव्हा बाटल्या येतील, तेव्हा त्यात बीअर भरली जाईल.
जिल्हय़ातील ६ बीअर उत्पादक दिवसाला २५ ते ३० लाख बीअरच्या बाटल्या उत्पादित करतात. प्रत्येक खोक्यात १२ बाटल्या भरल्या जातात. असे खोके पुढे वितरणास पाठविले जातात. दुष्काळात पाणीटंचाईवर मात करूनही बीअर उत्पादकांनी मोठे उत्पादन केले. मात्र, केवळ बाटल्या कमी प्रमाणात असल्याने त्याचा विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ही स्थिती बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये लागू नाही. या अनुषंगाने बोलताना बीअर उत्पादक कंपनीतील वरिष्ठ अधिकारी एस. के. भौमिक म्हणाले, की हा नियम थंड पेयासाठी का लावला जात नाही? जुन्याच बाटलीत बीअर भरताना ती किमान सात ते आठ वेळा धुतली जाते. त्यानंतरच पुन्हा त्याचा वापर होतो. मात्र, या नव्या नियमामुळे अडचण झाली आहे.