जगभरात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यापासून बचावासाठी गर्दीची ठिकाणं टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील १०५ वर्षांची परंपरा असलेली सैलानी यात्रा रद्द करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. त्याचबरोबर संदल आणि होळीचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे.

भारतात कोरोना विषाणूंची लागण झालेल्या ३१ संशयीत रुग्णांची निश्चिती झाली आहे. त्यामुळे युद्धपातळीवर भारत सरकार आणि राज्य सरकारांनी मोठी पावल उचलली आहेत. लोकांना गर्दी ठिकाणं टाळण्याचे आवाहन केले जात आहे. त्यासाठी कामाच्या ठिकाणचे बायोमेट्रिक हजेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत, त्याऐवजी नोंदवहीचा वापर करण्यात येत आहे. त्याचबरोबर स्वच्छतेबाबतही जागरुक राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणावर एकत्र येण्याचे कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर होळीच्या वेळी भरणाऱ्या सैलानी यात्रेत एकत्र येणाऱ्या लाखो भाविकांचा विचार करता विभागीय आयुक्तांनी ही यात्राच रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

दरवर्षी या यात्रेमध्ये १ ते ५ लाख भाविक येत असतात. यामध्ये पन्नास टक्के लोक हे मानसिकदृष्ट्या आजारी असलेले लोक असतात. या लोकांना पूर्णपणे स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नसल्याने त्यांच्यासाठी यंदा ही यात्रा धोकादायक ठरू शकते. याचा विचार करता ही यात्राच स्थगित करण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.