विभागातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी येथील कोठारी विद्यालयात आयोजित नियामक बैठकीवर बहिष्कार टाकला तसेच उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक कार्यालयातर्फे मराठी विषयाच्या नियामकांची उत्तर पत्रिका तपासणीच्या विषयावर शनिवारी बैठक झाली. नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्ह्यांतील बहुतांश नियामक बैठकीस उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने प्रलंबित मागण्यांसाठी १२वीच्या फेब्रुवारी २०१३च्या उत्तरपत्रिका तपासणीवर मागण्या मान्य होईपर्यंत बहिष्कार जाहीर केला असल्याने विभागातील सर्व उपस्थित नियामकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर संपूर्ण बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतला. बहिष्काराचा निर्णय व आपल्या तीव्र भावना विभागीय मंडळाचे अध्यक्ष व सचिव यांच्यासमोर मांडल्या. तसेच नियामकाचे काम करतेवेळी नियामकाने उत्तर पत्रिकेची काऊंटर फाइल वेगळी करून जमा करण्यासारखी जाचक अट रद्द करून घेण्यात यश मिळविले.
विभागीय सचिव व अध्यक्षांनी शिक्षकांच्या तीव्र भावना व बहिष्काराचा निर्णय शासनास कळविण्याचे आश्वासन दिले. या वेळी राज्य महासंघातर्फे पुढील विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार कायम ठेवून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय उपस्थितांना सांगण्यात आला. या वेळी राज्य महासंघाचे कार्याध्यक्ष प्रा. संजय शिंदे, नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रा. के. एन. अहिरे, उपाध्यक्ष प्रा. रमेश शिंदे तसेच जिल्हा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.