दिगंबर शिंदे, सांगली

इंधन दरवाढीचा फटका यंदा पूजेसाठी तसेच आरतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कापराला बसला आहे.  पेट्रोलचे दर वाढल्याने पंधरा दिवसांपूर्वी ४०० रूपये किलोवर असलेल्या कापराचे दर वाढत जाऊन गणेशोत्सवातील सर्वाधिक मागणीच्या काळात बाराशे रूपयांवर पोहोचले आहेत.

कापूर हा ज्वलनशील पदार्थ म्हणून ओळखला जातो. तो बनवताना त्यामध्ये पेट्रोलजन्य पदार्थाचा वापर करण्यात येतो. या वापरामुळेच कापराचा हवेशी संपर्क येताच त्याची घनता कमी होत नष्ट होतो. एक महिन्याभरापूर्वी या कापराचा दर ४०० रुपये किलो होता. पण गेल्या पंधरा दिवसांपासून रुपयाचे अवमूल्यन होत इंधनाचे दर जसे भडकू लागले, तसे त्याचे परिणाम पेट्रोलजन्य अन्य पदार्थाच्या दरावरही दिसू लागले आहेत. याचाच फटका सध्या आरतीच्या ताटातील कापरालाही बसू लागला आहे. इंधन दरवाढीमुळे केवळ पंधरवडय़ात या कापराच्या दरात तिप्पट वाढ होत तो बाराशे रुपये किलोवर पोहोचला आहे. पंधरा दिवसापूर्वी किरकोळ बाजारात एक रूपयापर्यंत मिळणाऱ्या कापराच्या लहान वडीसाठी सध्या पाच रूपये मोजावे लागत आहेत.

’धार्मिक कार्यापासून ते विविध औषधी उपयोगापर्यंत कापराचा वापर होतो. या सर्व ठिकाणी कापराच्या तिपटीने झालेल्या दरवाढीचा फटका दिसू लागला आहे. श्रावण-भाद्रपद हे  सणांचे दिवस. या काळात कापराला मोठय़ा प्रमाणात मागणी असते.

’पण या दरवाढीमुळे अनेक ठिकाणी आरतीच्या ताटातून हा महागडा कापूर दिसेनासा होऊ लागला आहे. महागडय़ा कापराऐवजी तेला-तुपाचा दिवा लावणे अनेक ठिकाणी पसंत केले जात आहे.

श्रावण महिन्यातील सणांपासूनच कापराला मोठी मागणी असते. ही मागणी पुढे गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळीपर्यंत कायम राहते. पण या मागणीच्या काळातच इंधनाचे दर रोज वाढू लागल्याने कापराच्या घाऊक दरांमध्येही रोज बदल होऊ लागले आहेत. केवळ गेल्या पंधरा दिवसांमध्ये कापराचा घाऊक दर ४०० रुपये किलोहून थेट बाराशे रुपयांवर पोहोचला आहे. किलोमागे दरात झालेली ही तिप्पट वाढ प्रथमच अनुभवास येत आहे.

महेश फुटाणे, व्यापारी