News Flash

कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्षपद शिवसेनेला?

निश्चिती केली. या निवडणुकीत शिवसेनेने चार, भाजपने चार, दोन्ही काँग्रेसने प्रत्येकी सर्व म्हणजे सातही आणि मनसेने पाच जागा लढवल्या होत्या. प्रभाग पाचमध्ये शिवसेना व भाजपमध्ये

| January 13, 2015 03:10 am

अहमदनगर (भिंगार) कॅन्टोन्मेंट बोर्डात नेमकी मैत्रिपूर्ण प्रभागातीलच एकमेव जागा जिंकून भारतीय जनता पक्षाने या सत्तेच्या चाव्या आपल्या हाती ठेवल्या आहेत. येथे गेल्या वेळी हीच भूमिका भारतीय रिपब्लिकन पक्षाने बजावताना समान संख्याबळावर असलेली शिवसेना व काँग्रेस, यात पाच वर्षे काँग्रेसची पाठराखण करून शिवसेनेला या सत्तेपासून दूरच ठेवले होते. या पार्श्र्वभूमीवर आता उपाध्यक्ष कोण होणार याकडे भिंगारसह नगरकरांचे लक्ष आहे.  
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले होते. सोमवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. अवघ्या अडीच तासांत मतमोजणी पूर्ण होऊन साडेदहा वाजेपर्यंत सर्व जागांचे निकाल जाहीर झाले. मागच्या निवडणुकीत काँग्रेस व शिवसेना यांना प्रत्येकी ३ व भारिपला १ जागा मिळाली होती. भारिपच्याच मदतीने गेली पाच वर्षे येथे काँग्रेसचीच सत्ता होता. मात्र या निवडणुकीत काँग्रेसला येथे खातेही उघडता आले नाही. त्यांना एकही जागा मिळाली नाही. राष्ट्रवादीने मात्र जोरदार मुसंडी मारत ३ जागा जिंकल्या. शिवसेनेने त्यांच्या ३ जागा कायम राखल्या.
सोमवारी सकाळी ८ वाजता प्रभाग क्रमांक एकपासून मतमोजणीला प्रारंभ झाला. मोजणी केंद्राबाहेर सकाळपासूनच राजकीय कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. पहिल्याच प्रभागासह पहिल्या तिन्ही जागा राष्ट्रवादीच्या पारडय़ात गेल्या. या निकालामुळे राष्ट्रवादीच्या गोटात प्रचंड जल्लोष झाला. अन्य पक्षीयांमध्ये तोपर्यंत अस्वस्थता होती. मात्र पुढच्या चारही जागा जिंकून भाजप-शिवसेना युतीने राष्ट्रवादीची घोडदौड रोखून युतीच्या सत्तेचीही निश्चिती केली. या निवडणुकीत शिवसेनेने चार, भाजपने चार, दोन्ही काँग्रेसने प्रत्येकी सर्व म्हणजे सातही आणि मनसेने पाच जागा लढवल्या होत्या. प्रभाग पाचमध्ये शिवसेना व भाजपमध्ये मैत्रिपूर्ण लढत होती, ही जागा भाजपच्या शुभांगी साठे यांनी जिंकली. येथील शिवसेनेच्या उमेदवार व बोर्डाच्या मावळत्या सदस्या स्मिता कुंभारे (आष्टेकर) यांचा दारुण पराभव झाला. त्या चौथ्या क्रमांकावर गेल्या. लढवल्यापैकी एवढी एकच जागा शिवसेनेने गमावली.
फुलारी यांचे नाव चर्चेत
सत्तास्थापनेत भाजप-शिवसेना युती कायम राहील, असे गृहीत धरून बोर्डाच्या उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य प्रकाश फुलारी यांच्या नावाची चर्चा आत्ताच सुरू झाली आहे. मात्र भाजपमधील खासदार दिलीप गांधी व नगरचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्यातील पक्षांतर्गत वादाची झालरही याला आहे. मात्र आगरकर यांनी युतीच्या सत्तेवर शिक्कामोर्तब केले. ते म्हणाले, येथे युतीचीच सत्ता स्थापन होईल.
प्रभागनिहाय निकाल :
प्रभाग क्रमांक १– मीना मेहतानी (२४५ राष्ट्रवादी विजयी), स्वाती पतके (२४२, भाजप) आणि मार्गारेट जाधव (८५, काँग्रेस).
प्रभाग २– कली शेख (९०९, राष्ट्रवादी विजयी), महेश नांदे (६१०, भाजप), रिझवान शेख (८७, काँग्रेस), शिवाजी दहिहंडे (५८७, अपक्ष), नामदेव लंगोटे (३१४, अपक्ष) आणि मच्छिंद्र ताठे (२१६, मनसे).
प्रभाग ३– सादिक सय्यद (६८७, राष्ट्रवादी विजयी), किरण पानपाटील (३४७, भाजप), शाहीन अकील शेख (४०२, अपक्ष), संदीप काळे (१३४, मनसे), सुमित बनसोडे (२११, काँग्रेस), जाकीर रतन बागवान (१११, अपक्ष), निजाम मुसा सय्यद (३०, अपक्ष), रोहित कांबळे (२३, अपक्ष) आणि श्रावण काळे (११, अपक्ष).
प्रभाग ४- रवींद्र लालबोंद्रे (१ हजार ८७, शिवसेना विजयी), मतीन सय्यद (३७२, राष्ट्रवादी), शेख नूर अब्दुल रऊफ (४१३), श्यामराव वाघस्कर (४०, काँग्रेस), दीपक वाघस्कर (२५०, अपक्ष), प्रकाश लुणिया (३०, अपक्ष), नितीन जमधडे (१९, अपक्ष).
प्रभाग ५– शुभांगी साठे (८१०, भाजप विजयी), रत्ना घुले (७५१, अपक्ष), स्मिता कुंभारे-आष्टेकर (११६, शिवसेना), सुशीला कापसे (१०७, काँग्रेस) आणि माधवी काळे (१७१, राष्ट्रवादी).
प्रभाग ६– प्रकाश फुलारी (७८४, शिवसेना विजयी), रामचंद्र बिडवे (३१९, मनसे), विलास तांडेल (२०३, राष्ट्रवादी), सचिन बुक्कन (५८, काँग्रेस) आणि सुधा गंधले (३६१, अपक्ष).
प्रभाग ७- संजय छजलानी (६०३, शिवसेना विजयी), अजिंक्य भिंगारदिवे (२९६, राष्ट्रवादी), विजय भिंगारदिवे (४८१, काँग्रेस), सुदर्शन गोहेर (१२८, अपक्ष), प्रदीप वावरे (२०४, अपक्ष), पवन भिंगारदिवे (१९, अपक्ष), नीलेश सुंदरलाल (१८५) आणि रेखा वाघमारे (३३, अपक्ष).
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2015 3:10 am

Web Title: cantonment board vice president post to shiv sena
टॅग : Shiv Sena
Next Stories
1 पहिल्याच डीपीसीच्या तारखेचा गोंधळ!
2 रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार-रेल्वेमंत्री सुरेश प्रभू
3 मुद्रीत माध्यमांमध्ये वंचितांच्या प्रश्नांना स्थान – अच्युत गोडबोले
Just Now!
X