|| सुनील नवले
पुरामुळे बनलेल्या प्रवरा नदीची विलोभनीय स्थिती आकाशातून कॅमेराकैद
संगमनेर : कोणत्याही नदीला पूर, महापूर आला तर जीवित किंवा वित्तहानीच चर्चा केंद्रस्थानी असते. मात्र एखाद्या नदीला पूर आल्यानंतर तिने अत्यंत अनोखे, विलोभनीय रूपडे धारण करणे असा प्रकार बहुधा विरळाच. संगमनेर तालुक्यातून वाहणारी प्रवरा नदी मोठा पूर आला, की असे विलोभनीय रूप धारण करते. सुमारे शंभर एकर परिसराला सर्व बाजूंनी वेढा घालून येथे ही नदी तात्पुरत्या काळासाठी एका सुंदर बेटाची निर्मिती करते. एवढ्या मोठ्या आकाराच्या भूखंडाच्या गळ्यात जणू काही प्रवरा नदीने छानसा हार घालावा, असाच आभास यातून निर्माण होतो. गेल्या अनेक वर्षांनंतर अवतरलेला प्रवरेचा हा आकार सध्या सगळ्यांनाच भूल पाडत आहे.

अकोले तालुक्याच्या पश्चिम टोकावरील रतनगडावर उगम पावणारी प्रवरा कळस गावाजवळ संगमनेर तालुक्यात प्रवेश करते. तिथून पुढे चार-पाच किलोमीटर अंतरावर आल्यानंतर हे बेट निर्माण होते. धांदरफळ, निमज, डेरेवाडी आदी गावांच्या हद्दीत हे बेट तयार होते. हे बेट तयार होण्यामागे पुरासोबतच स्थानिक भूगोल अधिक कारणीभूत आहे.  दरवेळी नदीला पूर आल्यानंतर तयार होणाऱ्या या बेटाबाबत स्थानिक वगळता संगमनेर तालुक्यातील जनताही अनभिज्ञ आहे. एवढे मोठे बेट एका दृष्टीत मावणारे नाही. केवळ आकाशातूनच त्याचे संपूर्ण दर्शन घडते, हे त्यामागील प्रमुख कारण असावे. अनेक  पूर, महापूर आले तरी या बेटाची फारशी झीज झालेली नाही, हीदेखील विशेष बाब म्हणावी लागेल. त्याचे कारण तेथे नदीपात्रात असणाऱ्या कठीण खडकात असावे. याशिवाय बेटाच्या चहूबाजूंनी बऱ्यापैकी वृक्षराजी असल्यानेदेखील धूप होण्यास अटकाव निर्माण झालेला आहे.

अनेक शेतकऱ्यांची शेती या बेटावर आहे. पिढ्यान्पिढ्या ते आपली शेती कसतात. त्यासाठी जे पात्र कोरडे असते ती बाजू ये-जा करण्यासाठी वापरली जाते. पूर आल्यानंतर मात्र बेटावर जाणे दुरापास्त होऊन बसते. स्थानिक शेतकऱ्यांना ही गोष्ट नित्याची असल्यामुळे याचे त्यांना फारसे आश्चर्य वाटत नाही. परंतु बाहेरच्या व्यक्तीच्या नजरेत मात्र हा देखावा भरून राहतो.

एवढ्या प्रचंड आकाराचे हे बेट एका दृष्टीत मावत नाही. त्यामुळे ते सहजी डोळ्यांना दिसत नाही. जमिनीवरून संपूर्ण बेटाचे छायाचित्र काढणेदेखील केवळ अशक्य आहे. आकाशातून मात्र हे संपूर्ण बेट दृष्टिपथात येते. दोन्ही बाजूंचे प्रवाह सहज दिसतात. सध्या प्रवरेला पूर आल्याने काही दिवसांपुरतेतरी हे बेट पुन्हा प्रवाही झाले आहे.

 

घडते काय?

’पश्चिमेकडून वाहात आलेली प्रवरा डावीकडे उताराच्या दिशेने वाहात या संपूर्ण भूखंडाला पूर्ण वळसा घालत अंडाकृती आकार घेत पुढे निघते.

’नदीची पाण्याची पातळी ज्या वेळी सामान्य असते त्या वेळी हे पात्र अशाच पद्धतीने वाहात असते. मात्र ज्या वेळी प्रवरेला पूर येतो, त्या वेळी नदीतील पाण्याचा फुगवट्यात मोठी वाढ होते, तसेच या वेळी पाण्याला गतीदेखील मोठी असते.

’या वेळी नदीचा हा प्रवाह एका उंचवट्यावर चढून या भूखंडाच्या उजव्या बाजूनेही वाहू लागतो. या वेळी नदी पात्राचे हे वर्तुळ पूर्ण होत त्या भागाला एका सुंदर बेटाचे रूप बहाल होते.

फक्त पूर आल्यावर…  गेली शेकडो वर्षे पूर आला, की चार-पाच दिवसांसाठी हे बेट तयार होणे आणि पूर ओसरला की प्रवाह पुन्हा मूळ पद्धतीने वाहू लागणे ही क्रिया सुरू आहे.