रायगड जिल्हा प्रशासनाचा ई-दानपेटय़ा उपक्रम; भाविकांचा उत्तम प्रतिसाद; राज्यभरात लागू करण्याची गरज

रायगड जिल्ह्य़ातील मंदिरातील दानपेटय़ा आता रोकडरहित झाल्या आहेत. रायगड जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने पाली, महड आणि हरिहरेश्वर येथील मंदिरात ई-दानपेटय़ा उपक्रम सुरू केला आहे. क्यू आर कोड आणि मोबाईल बँकिंगसारख्या अॅपच्या माध्यमातून आता या मंदिरातील सत्पात्री दान करणे शक्य होणार आहे. राज्यात प्रथमच असा उपक्रम राबविण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्य़ातील महडचे वरदविनायक आणि पालीचे बल्लाळेश्वर या देवस्थानांचा अष्टविनायकांमध्ये समावेश होतो. तर श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर मंदिर हे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे दरवर्षी लाखो भाविक या मंदिरांना भेट देत असतात. येणारे भाविक मंदिर परिसरात असणाऱ्या पेटय़ांमध्ये दान करत असतात. तर काही भाविक मंदिराच्या देव्हाऱ्यात ठेवलेल्या ताटात दक्षिणा ठेवत असतात. मात्र या देवस्थानच्या दानपेटय़ामध्ये जमा होणाऱ्या रकमेचा योग्य विनियोग होतो की नाही याची चिंता भाविकांना अनेकदा भेडसावत असते. मंदिरातील दानपेटय़ाचे व्यवहार पारदर्शकपणे व्हावे यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.

रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि तीनही देवस्थान ट्रस्टची संयुक्त बैठक झाली. यानंतर पाली, महड आणि हरिहरेश्वर या तीनही मंदिरात हा ई-दानपेटी उपRम राबविण्याचे निष्टिद्धr(१५५)त करण्यात आले. तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर हा उपक्रम कार्यान्वित झाला आहे आधुनिक बँकिंग प्रणालीच्या माध्यमातून सत्पात्री दान करणे शक्य झाले आहे. रोकडरहित प्रणालीमुळे दानाची रक्कम भाविकाच्या खात्यातून देवस्थांनच्या खात्यात जमा होणार आहे. या देणगीची ऑनलाइन पावतीही तात्काळ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे देवस्थानच्या आर्थिक व्यवहारात अधिक पारदर्शकता येणार आहे.

घरबसल्या देणगी शक्य

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे भाविक मंदिरात येऊ  शकत नाही, त्यांनाही देवस्थानला घरबसल्या देणग्या देणे आता शक्य होणार आहे. सरकारच्या भीम अॅपव्दारे अथवा यूपीआय अर्थात युनिफॉर्म पेमेंण्ट इनर्टफेसवर आधारित अॅपचा वापर करून हे दान करणे शक्य होणार आहे. यासाठी मंदिराच्या अधिकृत क्यू आर कोडचा वापर करून अथवा देवस्थानच्या अधिकृत बँक खात्याला संलग्न असणाऱ्या मोबाईल नंबरचा वापर करून अथवा बँक खात्याचा क्रमांक वापरूनही हे दान करता येणार आहे. राज्यात प्रथमच हा उपक्रम राबविण्यात आला आहे. भाविकांकडूनही या उपRमाला सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील इतर भागातील मोठय़ा देवस्थानांमध्ये ही संकल्पना राबविली तर देवस्थानचा कारभार अधिक पारदर्शक होण्यास मदत होईल आणि दानपेटय़ातील व्यवहार रोकडरहित होतील यात शंका नाही.

कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन मिळावे, देवस्थानच्या व्यवहारात पारदर्शकता यावी यासाठी ही ई-दानपेटी संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरवातीला तीन प्रमुख देवस्थानांत हा उपक्रम सुरू करण्यात आला असला तरी जिल्ह्य़ातील सर्व देवस्थानांमध्ये असा उपक्रम सुरू व्हावा असा आमचा प्रयत्न राहणार आहे.    -डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड

देवस्थानात कॅशलेस दानपेटय़ा असाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. मात्र तांत्रिक अडचणीमुळे ते शक्य होत नव्हते, जिल्हाधिकारी आणि धर्मादाय आयुक्तांनी यात पुढाकार घेऊन या तांत्रिक अडचणी दूर करून दिल्या, आणि ई-दानपेटय़ा संकल्पना प्रत्यक्षात कार्यान्वित झाली, तरुण भाविकांकडून याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.   – सिद्धेश सुनील पोवार, सचिव, हरिहरेश्वर देवस्थान