विद्यार्थ्यांना संगीत, नृत्य, नाटक यासह पाककलेचेही शिक्षण

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) संलग्न शाळांमध्ये पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात कला शिक्षण बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. कला शिक्षणामध्ये संगीत, नृत्य, नाटक या पारंपरिक कलांसह पाककलेचाही समावेश करण्यात आला असून या निर्णयामागे विद्यार्थ्यांचे शिक्षण आनंददायी करण्याचा सीबीएसईचा विचार आहे.

शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे घटक असलेल्या शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक राष्ट्रीय शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) आणि कला क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्याशी सीबीएसईने चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासामध्ये कला महत्त्वाची ठरते. त्यामुळे त्याचा समावेश शिक्षणामध्ये करणे संयुक्तिक ठरेल असे मत या चर्चेत पुढे आल्याने सीबीएसईने कला शिक्षण अभ्यासक्रमात आणण्याचा निर्णय घेतला. कलांच्या समावेशामुळे पारंपरिक शिक्षण आंतरविद्याशाखीय होईल.

कला शिक्षणामध्ये सीबीएसईने चार प्रकारांना प्राधान्य दिले आहे. त्यात संगीत, नृत्य, दृश्यकला आणि नाटक यांचा समावेश आहे. तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाककलेचीही ओळख करून द्यावी, असे सीबीएसईने स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांना पाककलेची ओळख करून दिल्याने त्यांना पौष्टिक खाद्य, भारतातील पिके, वेगवेगळ्या प्रकारची धान्य, भाज्या, तेल कसे तयार होते, शेतीची योग्य पद्धत या विषयीही माहिती मिळेल. तसेच विद्यार्थ्यांना विविध राज्यांतील वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचीही ओळख होईल, असे सीबीएसईचे म्हणणे आहे.

कला शिक्षणाचा भाग म्हणून सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पाककलेसाठी काही वर्ग घेण्यात यावेत. त्यात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे प्रमाण सारखेच असावे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन नावीन्यपूर्ण पद्धतीने शिकवण्यासही हरकत नाही. मात्र, शिकवण्यापेक्षा विद्यार्थ्यांना त्यातून आनंद मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे हे वर्ग समावेशक, संवादी आणि प्रयोगशील असावेत, असेही निर्देश सीबीएसईने दिले आहेत.

येत्या शैक्षणिक वर्षांपासूनच अंमलबजावणी

अभ्यासक्रमात कला शिक्षण बंधनकारक करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षांपासूनच करण्यात येईल. त्यामुळे शाळांनी दर आठवडय़ाला किमान दोन तास कला शिक्षणासाठी देणे आवश्यक असल्याचे सीबीएसईने नमूद केले आहे. कला शिक्षणाची परीक्षा होणार नाही, तर वर्षभरातील एकूण प्रक्रियेवर आधारित विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात येईल. त्यात विद्यार्थ्यांकडून काही प्रयोग, प्रकल्प करून घेतले जातील, तर कलांची मूलभूत ओळख करून दिली जाईल.