News Flash

भटक्या कुत्र्यांमधील संसर्गजन्य सीडीव्ही रोगाची वाघांनाही लागण होण्याची भीती व्याघ्र प्रकल्पांना सतर्कतेची सूचना

भटक्या कुत्र्यांमध्ये आढळून आलेल्या लेथल कॅनाइन डिस्टेंपर व्हायरस (सीडीव्ही) या सांसर्गिक रोगाची लागण देशभरातील वाघांमध्ये होण्याची शक्यता असल्याने अधिक खबरदारी घेण्याच्या सूचना राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन

| June 22, 2013 05:08 am

भटक्या कुत्र्यांमधील संसर्गजन्य सीडीव्ही रोगाची वाघांनाही लागण होण्याची भीती व्याघ्र प्रकल्पांना सतर्कतेची सूचना

भटक्या कुत्र्यांमध्ये आढळून आलेल्या लेथल कॅनाइन डिस्टेंपर व्हायरस (सीडीव्ही) या सांसर्गिक रोगाची लागण देशभरातील वाघांमध्ये होण्याची शक्यता असल्याने अधिक खबरदारी घेण्याच्या सूचना राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) सर्व राज्यांच्या मुख्य वन्यजीव संरक्षकांना दिल्या आहेत. भारतात वाघांची संख्या १७००च्या आसपास असून, नव्या प्रगणनेनंतर त्यांची निश्चित आकडेवारी स्पष्ट होईल. परंतु, या नव्या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भाने ही दुर्मीळ प्रजाती धोक्यात येऊ नये याची खबरदारी वन विभागाला घ्यावी लागणार आहे.
गेल्या उन्हाळ्यात चंद्रपूर जिल्ह्य़ातील जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघांचे मनुष्य आणि पाळीव प्राण्यांवर मोठय़ा प्रमाणात हल्ले झाले. चंद्रपुरात ९, तर गोंदियात ५ महिला यात मृत्युमुखी पडल्या. अनेक पाळीव प्राण्यांनाही वाघांनी भक्ष्य बनविले आहे. पाळीव प्राण्यांमधूनच हा संसर्ग वन्यजीवांमध्ये परसतो. एनटीसीएचे उपमहानिरीक्षक एस.पी. यादव यांनी गेल्या १४ जून रोजी वनक्षेत्रांच्या आसपास भटकणारी जनावरे आणि कुत्र्यांच्या लसीकरणाची मोहीम राबविण्याचे निर्देश जारी केले होते. वन्यजीवांच्या वागणुकीत सामान्य वागणुकीपेक्षा बदल होत असेल तर त्याचे निरीक्षण करून त्याची माहिती संकलित करण्याचीही सूचना यात करण्यात आली होती. सीडीव्ही हा संसर्गजन्य रोग पूर्णपणे बरा होणार नाही. तापाने फणफणणे, डोळ्यातून पाणी गळणे, उलटय़ा-जुलाब, हगवण, अर्धागवायू आणि नंतर मरण असाच रोगपीडित जनावरांचा प्रवास असतो.
ब्रिटनच्या वाइल्डलाइफ व्हेट्स इंटरनॅशनलने सुंदरबनमधील वाघांमध्ये भटक्या कुत्र्यांमुळे सीडीव्हीचा प्रसार होत आहे का, याचा अभ्यास सुरू केला आहे. यानंतर याचे गांभीर्य एनटीसीएच्या लक्षात आले. त्यानंतर व्याघ्र प्रकल्पांमधील वाघांना या रोगाचा संसर्ग होऊ नये, यादृष्टीने उपाययोजना सुरू झाल्या आहेत. मृत जनावरांच्या शरीरातील पेशींचे नमुने संकलित करणे, व्याघ्र प्रकल्पांमधील पाण्याचा दर्जा तपासणे, त्याची रासायनिक चाचणी करणे, या नमुन्यांच्या दीर्घकाळ टिकण्यासाठी शीतगृहांची व्यवस्था करणे आदी सूचनांचा भडिमार वन खात्यावर करण्यात आला आहे. जगभरातील १३ देशांमध्ये फक्त ३५०० वाघ शिल्लक असून, त्यांना वाचविण्यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या मोहिमा राबविल्या जातात. परंतु, या रोगाचे संक्रमण झाल्यास संपूर्ण व्याघ्र प्रजातीच संकटात सापडणार असल्याने खबरदारी घेतली जात असल्याचे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
गुजरातमधील एका सिंहाचा अशा समांतर संसर्गाने मृत्यू झाल्याचा अहवाल एका नियतकालिकात प्रकाशित झाला आहे. या सिंहाने पाळीव प्राण्याचे मांस खाल्ल्याने त्याला हा संसर्ग झाला होता.
टांझानियात १९९४ मध्ये हाहाकार
सीडीव्हीच्या संसर्गाने टांझानिया आणि केनियात १९९४ साली हाहाकार माजविला होता. दोन्ही देशांमधील सुमारे एक हजार सिहांचा यामुळे मृत्यू झाला होता. एकतृतीयांश सिंहांची प्रजाती उद्रेकात नष्ट झाली. संसर्गजन्य कुत्र्यांच्या माध्यमातून या रोगाने सिंहांच्या शरीरावर आक्रमण केल्याचे नंतरच्या अभ्यासातून स्पष्ट झाले. त्यानंतर कुत्र्यांच्या लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2013 5:08 am

Web Title: cdv of wandering dogs may transfer to tigers
Next Stories
1 आदिवासींचा छळ थांबवा; अन्यथा राजकीय हत्या घडवू नक्षलवाद्यांची पत्रकाद्वारे धमकी
2 मराठवाडय़ाचा ‘टँकरवाडा’ ‘साखरमाये’बरोबर टँकरच्या संख्येत वाढ
3 चिखलदऱ्याचा विकास आराखडा सहा वर्षांपासून लालफितीत!
Just Now!
X