गोंदिया : ओबीसींच्या जनजगणेसंदर्भात केंद्राने राज्यसभेत ओबींसीची जनगणना करणार नाही आणि ओबीसींची आकडेवारी देणार नाही, असे सांगितल्यामुळे भाजप सरकार ओबीसींच्या किती विरोधात आहे, हे स्पष्ट होते. राज्य सरकार धानाचा ५० टक्के बोनस आणि नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन राशी लवकरच देणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी गोंदिया येथील विश्रामगृहात रविवारी रात्री पत्रकारांशी बोलताना दिली.

पटोले यांनी महाराष्ट्रात या आठवडय़ात पूरपरिस्थती निर्माण झाली. २४ तासात ७०० मिमी. पाऊस पडल्याने त्या ठिकाणची परिस्थिती काय राहणार आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात अडचणीत सापडलेल्या लोकांना मदत करण्यापेक्षा राजकारण करणाऱ्या लोकांनी जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. करोनाच्या संकटामुळे व्यापाऱ्यांची प्रतिष्ठाने दुपारी ४ वाजतापर्यंत खुली असतात. महामारीच्या प्रकोपामुळे केंद्राने दिलेल्या निर्देशानुसार करोनाचे नियम लागू करण्यात आले. महाराष्ट्रात तिसरी लाट येणार असल्याची शक्यता असल्याने या परिस्थितीला हाताळण्यासाठी नियम लागू करण्यात आल्याचे सांगितले. पक्षाने निवडणूक लढण्यासंदर्भातील आपली भूमिका आधीच स्पष्ट केली असून त्यावर वारंवार बोलण्याची काही गरज नसून महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये मोठय़ा संख्येने युवकांचा समावेश होऊ लागला आहे. इतर पक्षातील नेते काँग्रेसमध्ये येऊ लागल्याने २०२४ च्या निवडणुकीत आम्ही मोठा पक्ष म्हणून समोर येऊ, असेही पटोले म्हणाले. यावेळी देवरीचे आमदार सहेसराम कोरोटे,  जिल्हाध्यक्ष डॉ. एन.डी किरसान, माजी आमदार दिलीप बन्सोड, अमर वराडे, गप्पू गुप्ता, रत्नदीप दहिवले, जितेंद्र कटरे उपस्थित होते.