बुधवारी रात्री चंद्रपुरमध्ये भीषण अपघात झाला असून सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मूल तालुक्यातील केसलाघाट येथे रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव वेगातील स्कॉर्पिओने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना प्रथमिक उपचारासाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, जखमींची प्रकृती खालावत असल्याने त्यांना तात्काळ चंद्रपुरमधील वैद्यकीय महाविद्यालयात हलविले.

या अपघातात मृत्यू झालेल्यात तीन महिला, दोन पुरूष आणि एका दोन वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. तर गंभीर जखमींमध्ये चालकांसह पाच महिलांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, अपघातील सर्वजण चंद्रपूरच्या बाबूपेठ परिसरातील भोयर व पाटील कुटुंबातील सदस्य आहेत. गोंदिया येथून देवर्दशनावरून परतताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.

ही घटना बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. स्कार्पिओ क्रमांक एमएच ३४ एबी ९७८६ या गाडीनं चंद्रपूरच्या बाबूपेठमधील भोयर आणि पाटील कुटुंबातील सदस्य प्रतापगड येथे देवदर्शनाला गेले होते. देवदर्शनाहून परताना केसलाघाट ते नागाळा दरम्यान रस्त्याच्या बाजूला असलेला एमएच ३४ एपी २५३३ या ट्रकला जोरदार धडक दिली. दुर्दैवी अपघाताची माहिती कळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळावर एकच गर्दी केली. स्थानिकांना अपघातील जखमींना वाचण्याचा प्रयत्न केला. मूल पोलिसही घटनास्थळावर तात्काळ दाखल झाले. मूल पोलिस रात्री उशीरापर्यंत घटनास्थळावर तपास करत होते. रस्त्याच्या बाजूला असलेल्या ट्रकला भरधाव स्कॉर्पिओने धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.