कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील स्वयंसहायता समुहाने सुमारे ३.२५ लाख कापडी मास्कचे उत्पादन करुन ५४ लाखाची आर्थिक उलाढाल केली आहे. टाळेबंदीच्या काळात केवळ मास्क विक्रीतून इतक्या मोठ्या प्रमाणात अर्थाजन करणारा हा एकमेव स्वयंसहायता समुह आहे.

मार्च महिन्यात कोविड-19 ला प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असताना, मास्कचा तुडवडा भासला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा अभियान संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांनी कापडी मास्क तयार करण्याबाबत विचार समोर ठेवला होता. त्यामुळे जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्यावतीने कापडी मास्क निर्मितीचे नियोजन केले गेले. कापडी मास्क तयार करण्याचा पहिलाच प्रयत्न असल्याने तज्ज्ञ मंडळीकडून कापडाचा दर्जा आणि रचना या विषयी माहिती घेवून कापडी मास्कचे उत्पादन करण्यात आले.

विविध शासकीय विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी प्रतिबंधक उपाय योजत असताना क्षेत्रकार्य करीत असल्याने, विविध विभागांनी उमेद अभियानाच्या स्वयंसहायता समुहांकडे मास्कची मागणी केली. मागणीनुसार दुहेरी आणि तिहेरी कापड असलेले मास्क तयार करण्याचे काम सुरु झाले. मार्च ते एप्रिल या महिन्यात मोठया प्रमाणात मागणी वाढल्याने जिल्हाभरातील सुमारे २५० हून अधिक स्वयंसहायता समुहांनी दिवसरात्र एक करुन विभागांची गरज पुर्ण केली. या माध्यमातून सुमारे ८०० पेक्षा अधिक महिलांना रोजगार मिळाला. जिल्हयातील १५ तालुक्यांतील समुहांनी यात हिरीरीने सहभाग नोंदवून कापडी मास्कचे उत्पादन केले.

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नगर परिषदा, आरोग्य विभाग या शासकीय कार्यालयासोबतच स्थानिक स्तरावर ग्रामपंचायतीने नोंदविलेल्या मागणीनुसार समुहांनी मास्क पुरवले. याचबरोबर चंद्रपूरनजीक असलेल्या खासगी कंपन्या, औषध दुकाने तसेच कापड विक्रेत्यांनीदेखील महिलांकडून कापडी मास्कची खरेदी केली. आजतागायत मास्क उत्पादनातून ५४ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी देखील स्वयंसहायता समुहांच्या या कार्यास वेळोवेळी प्रोत्साहन दिले. तसेच, दर्जाबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले. या सर्व नियोजनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, जिल्हा अभियान सहसंचालक शंकर किरवे, जिल्हा व्यवस्थापक गजानन ताजने तसेच तालुका अभियान व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक यांनी मोलाची भूमिका बजावली.