02 March 2021

News Flash

तारापूर एमआयडीसीत रासायनिक पाण्याचा पूर

कारखान्यात प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याने गटारे तुडुंब

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील ‘ई झोन’मध्ये मुख्य रस्त्यावर साचलेले रासायनिक सांडपाणी.

कारखान्यात प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याने गटारे तुडुंब

हेमेंद्र पाटील, बोईसर

तारापूर औद्योगिक क्षेत्रात रासायनिक सांडपाणी पाण्याचे प्रवाह रस्तोरस्ती वाहत आहेत. या पाण्याला तीव्र दुर्गंधी आहे. त्यामुळे त्याचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. पाण्यात काही प्रमाणात घातक रसायने मिसळलेली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र या स्थितीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने डोळेझाक केल्याचे चित्र आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील ‘ई झोन’मध्ये कारखान्यांसमोरील जागेत आठ दिवसापांसून उग्र गंधयुक्त सांडपाण्याचा प्रवाह वाहत आहे. काही ठिकाणी हे पाणी साचून राहिलेले आहे. पावसाळी पाणी निचरा होण्यासाठी बांधलेल्या गटारात कारखानदार रात्रीच्या वेळी रासायनिक सांडपाणी सोडत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

रासायनिक पाण्यामुळे येथील गटारे भरलेली असतात. याचा त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. या साऱ्या स्थितीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकारी आणि काही कारखानदार यांच्यात ‘सख्य’ आहे. त्याच्यातून असे प्रकार घडत असल्याचा आरोप येथील एका कार्यकर्त्यांने केला. हा दुष्परिणाम तारापूरमधील हवा, पाणी आणि जमिनीवर होत आहे.  सांडपाणी वाहून नेणारी वाहिनीदेखील नादुरुस्त आहे. तसेच येथील प्रक्रिया न करता पावसाळी पाणी वाहणाऱ्या गटारात सांडपाणी सोडणाऱ्या कारखानदारांची चौकशी करून तातडीने कारवाई केली जाईल, असे तारापूरमधील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी मनीष होळकर यांनी सांगितले.

प्रक्रियेविना सांडपाणी रस्त्यावर

गेल्या वर्षभरात प्रदूषण रोखण्यासाठी नियंत्रण मंडळ अपयशी ठरले आहे. कधी वायुप्रदूषण तर कधी रासायनिक सांडपाण्याचा मुद्दा तारापूर नेहमीच चर्चेत असते. परंतु तात्पुरती कारवाई करून प्रदूषणकारी कारखान्यांना पुन्हा प्रदूषण करण्यासाठी मोकळीक दिली जाते. औद्योगिक क्षेत्रात ई झोनमध्ये रस्त्यावर आलेल्या सांडपाण्याचा पूर हा सांडपाणी वाहिनी नादुरुस्त असल्याने रस्त्यावर रासायनिक सांडपाणी आल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे म्हणणं असले तरी प्रत्यक्षात येथील कारखानदारांनी सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच थेट रासायनिक सांडपाणी रात्रीच्या वेळी नाल्यात सोडत असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यातही पावसाळा सुरू झाला की तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखानदार पावसाळ्यात रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच नाल्यात सोडून देत येते. रासायनिक सांडपाणी पावसाच्या पाण्यासोबत नैसर्गिक नाल्यात जाते. संपूर्ण औद्योगिक क्षेत्रात अनेक ठिकाणी पावसाळी साचलेल्या पाण्यात रासायनिक सांडपाणी सोडल्यावर याबाबत कोणाला कळतही नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2019 2:37 am

Web Title: chemical water in tarapur midc zws 70
Next Stories
1 तेलंगणकडून महाराष्ट्र धडा घेणार?
2 सांगलीतील गुन्हेगारी वाढली, पोलीस यंत्रणा ढिम्म
3 सांगलीत नगरसेवकाला नगरसेविकेच्या पतीची मारहाण
Just Now!
X