विधानभवन कँटीनच्या मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे आढळल्याने बुधवारी एकच खळबळ उडाली होती. सहकार विभागातले अधिकारी मनोज लाखे जेवत असताना त्यांना मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे आढळले. पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान हा प्रकार घडल्याने हा विषय आज सभागृहातही चर्चेला आला. ज्या भेसळखोरांनी हे कृत्य केले आहे त्यांना जन्मठेपेची शिक्षा द्या अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. मनोज लाखे यांनी विधानसभा सचिव जितेंद्र भोळे यांना हा सगळा प्रकार निदर्शनास आणून दिला.

या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद आज सभागृहात उमटले. जे भेसळखोर आहेत त्यांना जन्मठेपेची शिक्षा करा अशी मागणी अजित पवार यांनी सभागृहात केली. तसेच इतर विरोधकांनीही या प्रकरणी कारवाईची मागणी केली. ज्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात जे दोषी असतील त्यांचं निलंबन केलं जाईल आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं. जी घटना घडली ती अत्यंत गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि जे दोषी असतील त्यांना शिक्षा सुनावली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

सहकार विभागातील अधिकारी मनोज लाखे यांनी कॅन्टिनमध्ये मटकीच्या उसळची थाळी मागवली होती. यावेळी उसळमध्ये त्यांना चिकनचे तुकडे आढळले. मनोज लाखे यांनी विधानसभा सचिव जितेंद्र भोळे यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला असून तक्रार केली आहे. कंत्राटदाराचा निष्काळजीपणा यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामुळे कॅन्टिनमध्ये आमदार, नेते, पोलीस आणि पत्रकारांची चांगलीच गर्दी असते. त्यातच हा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान कँटीन पर्यवेक्षक रविंद्र नागे यांनी झालेल्या प्रकाराबद्दल मनोज लाखे यांची माफी मागितली.

मात्र या सगळ्या प्रकरणाचे पडसाद आज अधिवेशनातही उमटले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणी भेसळखोरांना जन्मठेप द्या अशी मागणी केली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी कारवाईचं आश्वासन दिलं आहे.