धवल कुलकर्णी-

“३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातील शनिवार वाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेचा तपास NIA कडे देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला नाही. हा तपास केंद्र सरकारने स्वतःच्या अधिकारांचा वापर करत त्यांच्या अखत्यारीत घेतला आहे. केंद्र सरकारनं राज्य सरकारच्या तपासावर अविश्वास दाखवला आहे. त्यावर मी नाराज आहे,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एल्गार परिषदेच्या तपासावर म्हणाले.

सोमवारपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हणाले,”एल्गार परिषदेचा तपास मी केंद्राला दिलेला नाही. केंद्राने त्यांच्या अधिकारांमध्ये स्वतःकडे घेतला आहे. याबाबत आम्ही नाराज आहोत. कारण हे राज्याच्या तपास यंत्रणेबाबत अविश्वास दाखवण्यासारखं होतं. केंद्राने हा तपास त्यांच्या अधिकारांमध्ये स्वतःकडे घेतला आहे आणि त्याबाबत आम्ही आमची नाराजी त्यांना कळविली आहे,” असे ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे –

CAA बाबतची आमची भूमिका मी सामनाच्या मुलाखतीतून मांडली असून, NPR च्या बाबतीत सरकारमधील जबाबदार मंत्र्यांची समिती नेमण्यात येईल. यामध्ये NPR च्या प्रश्नावलीत काही अडचणीचे प्रश्न आहेत का हे तपासण्यात येईल.

सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वातंत्र्यवीरांच्या बाबतचा ठराव स्वतः मुख्यमंत्र्यांनी विधान मंडळांमध्ये मांडावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याबाबत बोलताना ठाकरे म्हणाले,”ज्यावेळेला विषय येईल, त्या वेळेला याबाबत मी उत्तर देईन. पण मला नम्रपणे एवढंच सांगायचंय की, ज्यावेळेला सावरकरांच्या कवितांची पंक्ती असलेली पाटी अंदमान मधल्या सेल्युलर तुरुंगातून तत्कालीन काँग्रेस सरकारच्या आदेशाने काढण्यात आली. त्या वेळेला भारतीय जनता पक्षाचे राम कापसे अंदमानचे राज्यपाल होते. मात्र त्यावेळेस त्यांना भाजपने राजीनामा देण्यास सांगितले नाही हे मी नमूद करू इच्छितो.

भाजपानं सावरकर आणि हिंदुत्व या विषयांचा मक्ता घेतलेला नाही. ते म्हणतात तेच हिंदुत्व आहे असं मी मानत नाही. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रामध्ये कुठलाही दंगा झाला नाही आणि त्याउलट भाजपाचे शासन असलेल्या उत्तर प्रदेशामध्ये अनेक दंगेधोपे झाले असून, दिल्लीमध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठांमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारहाण करणार्‍यांना अजूनही अटक झालेली नाही. शाहीन बागचे आंदोलन जवळजवळ दोन महिने सुरू आहे.

अयोध्येला जाण्याचं त्यादिवशीच ठरवू -अजित पवार

“७ मार्च रोजी उद्धव ठाकरे अयोध्याला जाऊन प्रभू रामचंद्राला नमन करणार आहेत. तुम्ही जाताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना सुद्धा सोबत मिळणार का? असे विचारले असता उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,”राम मंदिराच्या निर्माणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत केले आहे. ज्यादिवशी अयोध्येला जायचे की नाही, हे त्या दिवशीचा कार्यक्रम पाहूनच ठरवू,” असं उत्तर अजित पवार यांनी दिलं.