राज्याचे मुख्य सचिव डॉ. जयंत बांठिया यांनी आंबोली घाटाला पर्यायी रस्ता आणि वाहनतळाचा आढावा आंबोलीत बांधकाम व वनखात्याच्या बैठकीत घेतला. अंबोलीती ल बांधकाम खात्याच्या निकृष्ट कामाबाबत मध्यंतरी तक्रारीही होत्या. त्याबाबत त्यांनी बोलण्याचे टाळत आंबोली-कावळेसाद पॉइंटला भेट दिली.
आंबोली घाट रस्ता दरड कोसळून बंद होता. गेल्या दोन-तीन हंगामात आंबोली पर्यटनावर त्यामुळे परिणाम झाला होता. त्यामुळे राज्याचे मुख्य सचिव जयंत बांठीया यांनी आंबोलीत सार्वजनिक बांधकाम व वनखात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
या वेळी तहसीलदार विकास पाटील, उपवन संरक्षक तुकाराम साळुंखे, उपअभियंता एन. बी. नवखेडकर, शाखा अभियंता विजय चव्हाण व अधिकारी या वेळी उपस्थित होते. आंबोलीत वाहनतळ उभारण्यासाठी प्रस्ताव आहे. वनखात्याची जमीन असल्याने त्याचा आढावा घेऊन वाहनतळास मंजुरी देण्यात येईल, असे त्यांनी आश्वासन दिले.
आंबोली घाटाला पर्यायी ठरणारा चौकूळ-फणसवडे-केसरी या रस्त्याचा आढावा घेतला. वनखात्याला तातडीने प्रस्तावाची छाननी करण्याचे बांठीया यांनी निर्देश दिले.
यानंतर राज्याचे मुख्य सचिव जयंत बांठीया यांनी आंबोली कावळेसाद पॉइंटला भेट दिली, तसेच दरड कोसळत असणाऱ्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या संरक्षक कठडय़ाची पाहणीही केली.
राज्याचे मुख्य सचिव जयंत बांठीया यांनी दौऱ्यात आंबोलीच्या कामाची पाहणी व आढावा घेतल्याने सर्वाच्याच भुवया उंचावल्या. आंबोलीमधील बांधकाम खात्याच्या कामाबाबत वारंवार तक्रारी होत आहेत, असे पत्रकारांनी विचारले असता तुम्ही चांगले पाहा, असे त्रोटक उत्तर त्यांनी देऊन निकृष्ट कामाबाबतच्या तक्रारीबाबत बोलण्याचे टाळले. आंबोलीत वाहनतळ व पर्यायी रस्ता प्रश्नावर पावसाच्या पूर्वसंध्येला राज्याच्या मुख्य सचिवांनी लक्ष दिल्याने समाधान व्यक्त होत आहे.