19 October 2019

News Flash

नाभिक समाजाची पुन्हा माफी मागतो- मुख्यमंत्री

'कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (संग्रहित छायाचित्र)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल पुन्हा एकदा माफी मागितली आहे. शुक्रवारी कोल्हापूरमधील वारणा येथे ‘मुख्यमंत्री दिलखुलास’ हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी आक्षेपार्ह विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. ‘कोणलाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता,’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली.

कोल्हापूरमधील कार्यक्रमात विविध क्षेत्रांमधील लोकांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले. यावेळी त्यांना नाभिक समाजाबद्दलच्या विधानाविषयी प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी आक्षेपार्ह विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. ‘माझ्या विधानावरुन वाद सुरु झाल्याचे लक्षात येताच मी त्याबद्दल एक पत्रक काढून तात्काळ माफी मागितली होती. मी समाजापेक्षा मोठा नाही. मात्र तरीही कोणाच्या भावना दुखावल्यास मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो,’ असे त्यांनी म्हटले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १२ नोव्हेंबर रोजी पाटस येथील साखर कारखान्याच्या उद्घाटनावेळी नाभिक समाजाबद्दल एक विधान केले होते. आघाडी सरकारच्या कालावधीतील सिंचन योजनांवर झालेल्या खर्चावर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी नाभिकाचे उदाहरण दिले होते. याबद्दल नाभिक समाजाने तीव्र आक्षेप नोंदवत मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा निषेध केला होता. याशिवाय भाजपच्या मंत्री, खासदार, आमदार आणि कार्यकर्त्यांची दाढी आणि कटिंग न करण्याचा निर्णय यवतमाळमधील नाभिक संघटनेने घेतला होता.

First Published on November 25, 2017 12:39 pm

Web Title: cm devendra fadnavis expressed apology about his statement on nabhik community