परभणी : जिल्ह्यतील शेतकऱ्यांना विम्याचे पैसे काही ठिकाणी मिळाले नाहीत. हा पसा विमा कंपन्यांना खाऊ दिला जाणार नाही. विमा कंपन्यावर कारवाई केली जाईल, या कंपन्यांना सरळ करून तुमचे पैसे तुमच्यापर्यंत नक्की पोहचवीन, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

परभणी जिल्ह्यत गुरुवारी दुपारी मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले. या वेळी सेलू येथे त्यांची जाहीर सभा पार पडली. या सभेला पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, यात्राप्रमुख सुजितसिंग ठाकूर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, मेघना बोर्डीकर, अभय चाटे आदींची उपस्थिती होती. सेलू येथे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, महाजनादेश यात्रा ही जनतेचा आशीर्वाद मागण्यासाठी असून आजवर जरी मराठवाडय़ाने दुष्काळ सहन केला असला, तरी यापुढच्या पिढय़ांना हा दुष्काळ सहन करण्याची पाळी येणार नाही, असे सांगितले. ‘वॉटरग्रीड’च्या माध्यमातून मराठवाडय़ातील सर्व धरणे जलवाहिनीने जोडली जाणार असून ६४ हजार किलोमीटरची वाहिनी त्यासाठी केली जाणार आहे. कोकणातून समुद्रात जाणारे १६७ टीएमसी पाणी यंत्राद्वारे उचलून गोदावरीच्या खोऱ्यात नेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रास्ताविकात मेघना बोर्डीकर यांनी सेलू-जिंतूर मतदार संघाच्या विकासविषयक प्रश्नांचा उल्लेख केला.

पाथरी येथील सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला. पराभव झाल्यानंतरही त्यांच्यात कोणतीच सुधारणा झाली नाही. १५ वर्षांत जेवढी कामे त्यांनी केली. त्या पेक्षाही पाच वर्षांत अधिक कामे आम्ही केली आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेची मुजोरी होती. लोकसभा निवडणुकीत त्यांना चारीमुंडय़ा चीत केले. आपण जनतेच्या आशीर्वादासह पुन्हा भाजप युतीचा झेंडा घेऊन परत येऊ, असा विश्वास या वेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या वेळी मंत्री लोणीकर, आमदार मोहन फड यांची भाषणे झाली.

पाथरीच्या सभेत व्यत्यय

पीकविम्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न पाथरीच्या सभेत झाला. या वेळी दोन तरुणांनी जोरदार घोषणाबाजी करत मुख्यमंत्र्यांच्या सभेत व्यत्यय आणला.

यामुळे मुख्यमंत्र्याना आपले भाषण थांबवावे लागले. यात्राप्रमुख  सुजितसिंग ठाकुर, मंत्री  लोणीकर यांना व्यासपीठावरून खाली यावे लागले. आंदोलक तरुणांच्या घोषणांचा आवाज वाढल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ या घोषणा दिल्या. प्रत्येक सभेत असे दोनतीन नमुने काँग्रेस-राष्ट्रवादीवाले पाठवतात, त्यांना प्रसिद्धी मिळते, असे या वेळी मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकरी चळवळीतील कार्यकत्रे स्थानबद्ध

आज महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभांचे आयोजन सेलू, पाथरी, परभणी या ठिकाणी करण्यात आले होते. यात्रेच्या पाश्र्वभूमीवर प्रचंड पोलीस बंदोबस्त तनात करण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांचे देवगाव फाटामाग्रे जिल्ह्यत आगमन होण्याआधीच पोलिसांनी धरपकड सुरू केली. शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना पोलिसांनी सकाळपासूनच ताब्यात घेतले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे किशोर ढगे, दिगंबर पवार, केशव आरमळ, लक्ष्मण गिरी या कार्यकर्त्यांना सकाळी दहा वाजता स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.  दिवसभर ताब्यात ठेवून दुपारी चार वाजता नवा मोंढा पोलिसात या कार्यकर्त्यांना आणण्यात आले. कॉ. राजन क्षीरसागर  न्यायालयीन प्रक्रियेबाबत पूर्णा पोलिस ठाण्यात होते. पोलिसांनी कॉ. क्षीरसागर यांना तिथेच अटक करून पूर्णा पोलीस ठाण्यात आणले.