मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या (बुधवारी) येथे दुष्काळ निवारण व जलनियोजन परिषद आयोजित केली आहे. जिल्ह्यातील दोन गावांना मुख्यमंत्री भेट देणार आहेत. दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याने कोणताही राजकीय कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेला नाही.
दुपारी १ वाजता मुख्यमंत्र्यांचे सावली विश्रामगृहावर आगमन होईल. दीड वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात त्यांच्या उपस्थितीत जिल्हा आढावा बठक होणार आहे. बठकीनंतर मुख्यमंत्री वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सभागृहात दुष्काळ निवारण व जलनियोजन परिषदेला ते हजेरी लावणार आहेत. परिषदेनंतर परभणी तालुक्यातील सुरिपप्री, तसेच गंगाखेड तालुक्यातील मरगळवाडी या गावांना मुख्यमंत्री भेट देणार आहेत. मरगळवाडी दौऱ्यानंतर मुख्यमंत्री लातूर जिल्ह्याकडे रवाना होतील. या संपूर्ण दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी राजकीय कार्यक्रमांना फाटा दिला असून, केवळ दुष्काळासंबंधी चर्चा व जलयुक्त शिवार अभियानाची पाहणी एवढेच या दौऱ्याचे स्वरूप आहे.
तगडा पोलीस बंदोबस्त
मुख्यमंत्र्यांचा दौरा दुष्काळी पाश्र्वभूमीवर असला, तरीही दौऱ्यादरम्यान सुरक्षा यंत्रणा आणि फौजफाटा मात्र प्रचंड आहे. पोलीस अधीक्षकांपासून ते पोलीस कर्मचाऱ्यांपर्यंत तब्बल ४६०जणांचा फौजफाटा या बंदोबस्तात आहे. अधीक्षक अनंत रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणय अशोक, पूर्णेचे जटाळे, संदीप गावित, शंकर केंगार, सेलूचे रोडे, जिंतूरचे किशोर काळे, उपअधीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त तैनात आहे. यात शहरासह सेलू, जिंतूर, मानवत येथील पोलीस निरीक्षक, ११ उपनिरीक्षक, ४३० पुरुष व ३० महिला कर्मचारी असा बंदोबस्त आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेचे पथक कार्यरत राहणार आहे.