कराड : छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वारस असलेले उदयनराजे यांच्या नावाने एवढी वर्षे मते मागणारे पक्ष आणि त्यांच्याच नेत्यांकडून आता उदयनराजेंवर टीका होत आहे. शिवरायांच्या या वारसाच्या भाजप प्रवेशाने लोकशाहीचा खून झाल्याची वक्तव्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला शोभत नसल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे बोलताना केली.

भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने आलेले मुख्यमंत्री फडणवीस येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, की उदयनराजे भोसले यांनी भाजपत प्रवेश केल्याने आमचा उत्साह दुणावला आहे. मात्र, पृथ्वीराज चव्हाणांसारखे नेते चुकीची टीका करीत आहेत. उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाने लोकशाहीचा खून झाल्याचे वक्तव्य नेत्यांच्या तोंडी शोभत नाही. ते ज्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये होते त्यावेळी या सर्व पक्ष-नेत्यांना उदयनराजे हवे होते. त्यावेळी त्यांच्यावर कुणीही टीका करत नव्हते. मात्र आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच अनेकांना याचा त्रास होऊ लागला आहे. उदयनराजे यांच्या प्रवेशाने आमच्या पक्षाची ताकद वाढली आहे, तर राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकल्यामुळे ते सध्या टीका करू लागले आहेत.

दरम्यान प्रगतीच्या क्रमवारीत महाराष्ट्र देशात आठव्या क्रमांकावरून तेराव्या क्रमांकावर गेल्याच्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, की  म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखालील राज्य ८ व्या क्रमांकावर असल्याचे चव्हाण मान्य करतात. खरेतर ही आकडेवारी त्यांना कुठून उपलब्ध झाली हे मला कळून येत नाही. सध्या महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर असून, आपले राज्य अव्वलस्थानी नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. नीती आयोग व रिझव्‍‌र्ह बँकेचे अहवाल पाहता महाराष्ट्र प्रगतिपथावरच असून, देशात होणाऱ्या एकूण गुंतवणुकींपैकी एकटय़ा महाराष्ट्रात यातील ४९ टक्के गुंतवणूक होत आहे. एकूण रोजगाराच्या २५ टक्के रोजगार केवळ महाराष्ट्राने दिला आहे. महाराष्ट्राच्या सद्यस्थितीची नेमकी माहिती शासनाच्या संकेतस्थळावर पहावी असा टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना लगावला. युती सरकारने सातारा जिल्ह्य़ातील रखडलेल्या प्रकल्पांना आवश्यक निधी दिला. मात्र, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाही सातारा जिल्ह्यातील योजनांना चालना मिळाली नसल्याची टीकाही फडणवीस यांनी केली.

महापुराची परिस्थिती पुन्हा उद्भवू नये याची दक्षता घेतली जात आहे. जागतिक बँक व एशियन बँकेकडून मदत घेत पूर नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा व दोष, दुरूस्ती करण्यासंदर्भातील काम सुरू आहे. यंदा प्रचंड मोठी पर्जन्यवृष्टी होऊन धरणे भरून वाहिल्याने मोठय़ा प्रमाणात पाणी वाहून गेले आहे. हेच पाणी दुष्काळी भागाला देण्यासाठी दीर्घकालीन योजना आखली जात असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

महायुती एकसंधपणे निवडणूक लढणार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून, ही चर्चा योग्य निर्णयाप्रत जाऊन महायुती एकसंधपणे विधानसभा निवडणुकीला सामोरी जाईल. लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असलेल्या महाजनादेश यात्रेने विधानसभेच्या ११२ मतदारसंघातून ३ हजार १८९ किलोमीटरचा प्रवास केला आहे. लोकांचा जनादेश पाहता सरकारबाबत राज्यभर उत्साहवर्धक वातावरण असल्याचेही फडणवीस यांनी या वेळी सांगितले.