मराठा आरक्षणाचा विषय प्रलंबित आहे, तसंच न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे ११ वीची प्रवेश प्रक्रिया थांबली आहे. मात्र आता ही प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु होण्याची चिन्हं आहेत. राज्य सरकारने यासंदर्भातले संकेत दिले आहेत.  याबाबत मुख्यमंत्री महाधिवक्त्यांसोबत चर्चा करत आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न असताना ११ वीचे प्रवेश कसे करता येतील यावर ही चर्चा सुरु आहे. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिल्यापासून हे प्रवेश थांबले आहेत. मात्र आता  ११ वीचे प्रवेश सुरु करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ११ वीच्या प्रवेशांबाबत कॅबिनेटच्या बैठकीतही सकारात्मक चर्चा झाली असंही भुजबळ यांनी सांगितलं.

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात अंतरिम स्थगिती मिळाली तेव्हापासूनच ११ वीच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशात आता या सगळ्यावर सकारात्मक तोडगा काढून ११ वीची प्रवेश प्रक्रिया कशी सुरु करता येईल याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महाधिवक्त्यांशी चर्चा सुरु आहे. ११ वीचे प्रवेश राज्यात कसे सुरु करता येतील त्यासाठी काय काय कायदेशीर उपाय असतील? विद्यार्थ्यांचं हित कसं जपता येईल या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची महाधिवक्त्यांशी चर्चा सुरु आहे.