मागच्या पाच वर्षांमध्ये कुंडल्या बघणारे आणि मागच्या वर्षभरात सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तकं आणि अहवाल वाचू लागले आहेत ही चांगली गोष्ट आहे असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभरातल्या कामाच्या पुस्तकाचे संदर्भ देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यावरुन उद्धव ठाकरेंनी हा टोला लगावला आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारचा खरपूस समाचार घेतला. त्या सगळ्याला मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत उत्तर दिलं आहे. आज त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दलही भूमिका मांडली. मराठा समाजाला आरक्षण देण्याची लढाई अंतिम टप्प्यात पोहचली आहे. महाराष्ट्र सरकारने यासाठी वकिलांची फौज आली आहे. मराठा समाजाचं आरक्षण टिकेल हा विश्वास मला आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

करोनावरुन आमच्यावर टीका करत आहेत. मात्र राज्याने एकही आकडेवारी पहिल्या दिवसापासून लपवलेली नाही. विरोधकांनी आमच्यावर टीका जरुर करावी आम्हाला काहीही आक्षेप नाही. मात्र आपल्या धारावी मॉडेलचं कौतुक जगाने केलं आहे या गोष्टी विरोधकांना दिसत नाही का? डॉक्टरांची टास्क फोर्स निर्माण करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. तसंच माझे कुटुंब माझी जबाबदारी ही योजनाही महाराष्ट्रात योग्य पद्धतीने राबवण्यात आली. याचंही कौतुक झालं आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या राजकारणात सक्रिय व्हावं असं मला वाटतं मला वाटतं की ही सुधीर मुनगंटीवार यांचीही हीच इच्छा आहे असंही उद्धव ठाकरे यांनी हसत हसत म्हटलं. त्यावर नाना पटोले यांनी आमच्या मित्राच्या मागे का लागता असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की तुम्ही इथेच थांबा तुम्ही कुठे जाऊ नका. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. येत्या काही वर्षांमध्ये प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठीही काम करणार आहोत. यासाठी आम्ही निधीही राखून ठेवणार आहोत. यावरुन तुमच्या हे लक्षात येईल की आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी जाहीर झाली आहे असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या आरोपाचाही मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला आहे. “महाराष्ट्रात काही सरकारविरोधात काही बोललं तर तुरुंगात टाकलं जातं, महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी आहे असा आरोप आमच्यावर झाला. मग ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा वापर तुम्ही कसा करत आहात? प्रताप सरनाईकांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला. त्यांच्या मुलांचीही चौकशी केली. नशीब त्याला नातू झालेला नाही नाहीतर त्याच्याही मागे ईडी चौकशी लावली असती. किंवा उद्या सांगतीलही की प्रताप सरनाईकांना नातू झाला तर आधी इथे घेऊन या. हे सगळं काय आहे? ही विकृतीच आहे. असं विकृत राजकारण आम्ही करत नाही” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे.