News Flash

सोलापुरात कोसळल्या धर्माच्या भिंती; कुलकर्णी काकूंवर मुस्लिम समुदायाने केले अंत्यसंस्कार

त्यांची मुलं आणि इतर नातेवाईक इतर शहरांमध्ये कामानिमित्त विखुरले आहेत.

सोलापूर : लॉकडाउनच्या काळात इथं माणुसकीचे दर्शन घडले. मुस्लिम समुदयानं ज्येष्ठ हिंदू महिलेच्या पार्थिवाला खांदा दिला.

एजाजहुसेन मुजावर

गेले दोन महिने करोना विषाणूने केलेला कहर आणि लागू झालेल्या टाळेबंदीमुळे अवघे जनजीवन जवळपास ठप्प झाले आहे. अशाही वातावरणात सामाजिक भान जपत, अडचणीत आलेल्यांच्या मदतीला धावून जाणाऱ्या मंडळींच्या हातून जाती-धर्माच्या भेदभावाच्या भिंती कोसळत आहेत. सोलापुरात कुलकर्णी काकूंचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मुस्लीम समुदाय धावून आल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

शहरातील नई जिंदगी चौकाचा परिवार बहुसंख्य गोरगरीब व मध्यमवर्गीय मुस्लीम समुदायाने वेढलेला. याच भागात पद्मावती कुलकर्णी (वय ८५) राहायच्या. त्यांचे चारही मुलं पुणे, बंगळुरू, अहमदाबाद, विजापूर अशा विविध शहरांमध्ये नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झाले आहेत. इकडे वृध्द कुलकर्णी काकूंच्या घरी त्यांच्या सोबत जावई आणि नातू राहतात. वृध्दापकाळाने कुलकर्णी काकूंचे गुरूवारी पहाटे राहत्या घरीच निधन झाले. शहरात नातेवाईक विखुरले आहेत.

परंतू, करोनाचा प्रादुर्भाव आणि टाळेबंदीमुळे नातेवाईक येऊ शकत नव्हते. एव्हाना, कुलकर्णी काकूंच्या चारही मुलांनी आईच्या अंत्यविधीसाठी येऊ शकत नसल्याचे कळविले. तेव्हा जावयाने आपल्या एका भावाला कसेबसे बोलावून घेतले. तरीही तीन माणसांनी मिळून अंत्यविधी कसा उरकायचा, असा प्रश्न पडला. कुलकर्णी काकूंचे शेजार-पाजारच्या मंडळींशी संबंध होते. तेव्हा ही मंडळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी धावून आली असता अंत्यविधी उरकरण्यासाठी मनुष्यबळाची असलेली अडचण सर्वाच्या लक्षात आली.

त्यानंतर तेथील नगरसेवक सय्यद बाबा मिस्त्री यांनीही तेथे धाव घेतली. हिंदू धर्माच्या रीतीरिवाजाप्रमाणे अंत्यविधीची व्यवस्था करण्यात आली. करोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित २५ मुस्लीम बांधवांनी अंत्ययात्रेत सहभागी होत कुलकर्णी काकूंच्या पार्थिवाला आलटून-पालटून खांदा दिला. नंतर एका शववाहिकेतून कुलकर्णी काकूंचे पार्थिव, मजरेवाडीतील हिंदू स्मशानभूमीत नेऊन तेथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 8:15 pm

Web Title: collapsed walls of religion in solapur kulkarni kaku was cremated by the muslim community aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 महाबळेश्वर, पाचगणीतील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू
2 महाराष्ट्रात २९३३ नवे करोना रुग्ण, १२३ मृत्यू
3 वर्धा : दिवसभरात चार जणांची करोनावर मात; वर्धेकर असणारे सर्व रूग्ण करोनामुक्त
Just Now!
X