|| अशोक तुपे

विधानसभा उपाध्यक्ष विजय औटींचा रंजक राजकीय प्रवास!

‘मातोश्री’शी असलेल्या थेट संपर्कामुळेच कम्युनिस्ट पक्ष ते शिवसेना व्हाया काँग्रेस असा राजकीय प्रवास केलेले पारनेरचे आमदार विजय औटी यांना विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेने संधी दिली. नगर जिल्ह्य़ाला हे पद मिळत असले तरी त्याचा शिवसेनेच्या स्थानिक राजकारणावर फारसा परिणाम होणार नाही.

पारनेर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर तीनवेळा निवडून आलेल्या औटी यांची राजकीय वाटचाल गमतीशीर आहे. १९५२ ते १९६२ या कालावधीत कम्युनिस्ट पक्षाचे पारनेरचे आमदार असलेले स्वर्गीय भास्करराव औटी यांचे ते चिरंजीव. कुटुंबात डाव्या विचारांचे संस्कार. आमदार विजय औटी यांनीही राजकारणात कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून प्रवेश केला. यूथ फेडरेशनचे ते पदाधिकारीही होते. भारत-रशिया मैत्री संघाच्या निमित्ताने ते रशियालाही जाऊन आले. नंतर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी स्थापन केलेल्या समाजवादी काँग्रेसमध्ये औटी यांनी प्रवेश केला. नगरच्या राजकारणात ज्या तरुणांना पवारांनी साथ दिली त्यांत औटी यांचा क्रमांक वरचा होता. समाजवादी काँग्रेसच्या तिकीटावर त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढविली. पुढे त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ते जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. या काळात नगरच्या कुरघोडीच्या राजकारणात त्यांना आमदारकी मिळाली.

नगरच्या राजकारणात पवार समर्थक विरुद्ध माजी खासदार बाळासाहेब विखे यांच्यात संघर्ष सुरू झाला. त्यातून पवार समर्थक माजी आमदार दिवंगत वसंतराव झावरे यांच्याशी विखे यांचा पारनेरमध्ये संघर्ष झाला. पारनेरच्या राजकारणात विखे यांचा एक गट कायम राहिला. माजी आमदार नंदकुमार झावरे हे त्यांचे कट्टर समर्थक. दोन झावरे यांच्यातील संघर्षांला पवार आणि विखे खतपाणी घालत असे म्हटले जात होते. वसंतराव झावरे यांना शह देण्यासाठी २००४च्या निवडणुकीत विखे यांनी नंदकुमार झावरे, काशिनाथ दाते, कम्युनिस्ट पक्षाचे आझाद ठुबे यांना एकत्र आणले. शिवसेनेने औटी यांना उमेदवारी दिली. वसंतराव झावरे यांच्या सर्व विरोधकांनी औटींना पक्षभेद विसरून मदत केली. त्यानंतर औटींनी मागे वळून पाहिले नाही. सलग तीनवेळा ते आमदार झाले. त्यांचे गणित जुळून आले.

जिल्ह्य़ातील प्रस्थापित नेत्यांची मदत नाही. साखर कारखाना, दूध संघ, बाजार समिती, शैक्षणिक संस्था असा पसारा नसूनही त्यांनी यश मिळविले. राजकीय तटस्थता हा गुण त्यांना लाभदायक ठरला. लाल सलाम ते जय महाराष्ट्र असा त्यांचा प्रवास झाला. त्यांना मंत्रीपदाची अपेक्षा होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचा थेट संपर्क. त्यामुळे संपर्कनेते, जिल्हाप्रमुख या सेनेच्या साखळीची त्यांना भीती वाटत नाही. ठाकरे यांचा विश्वास कमावल्याने त्यांना संधी देण्यात आली. यापूर्वीच ठाकरे यांनी औटी हे अभ्यासू आमदार असल्याने त्यांना राजकारणात चांगली संधी देण्याचे नगर जिल्ह्य़ाच्या दौऱ्यात जाहीर केले होते. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळेल, असा अंदाज होता. मात्र संधी मिळाली ती विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची. तीही थोडय़ा कालावधीकरिता. मात्र या निमित्ताने नगरला शिवसेनेने राज्यमंत्रीपदाच्या दर्जाचे पद दिले आहे.

औटी स्वभावाने तसे फटकळ. ते कार्यकर्त्यांचे फार लाड करीत नाहीत. सवंग लोकप्रियतेचे राजकारणही त्यांना मान्य नाही. कार्यकर्ते त्यांना दचकून असतात. मात्र मतदारांशी ते थेट संपर्क ठेवतात. लोकांमध्ये राहाण्याकरिता कामातून असलेला थेट संपर्क त्यांनी महत्त्वाचा मानला. अधिकाऱ्यांकडून कामे करून घेताना ते अत्यंत आक्रमक होतात. त्यांच्या आक्रमकतेला कधी कधी अरेरावीचीही धार असते. त्यातून अधिकारी आणि औटी यांच्यात अनेकदा चकमक उडाली.

औटी यांचे कामाचे नियोजनही घडय़ाळाच्या काटय़ावर चालते. सकाळी १० ते दुपारी १ व दुपारी ४ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच त्यांच्याकडे लोक कामे घेऊन येतात. त्यांची मैत्रीही मोजक्याच कार्यकर्त्यांशी आहे. शिवसेनचे तीनवेळा आमदार होऊनही ते कधी शिवसैनिक म्हणून मिरवले नाही. शिवसेनेची राजकीय शैली त्यांनी अंगवळणी पडू दिली नाही. सेनेच्या राजकारणाची झुलही कधी पांघरली नाही. असे असूनही त्यांनी ठाकरे यांचा विश्वास मात्र संपादन केला. त्यामुळे सेनेच्या पदाधिकाऱ्यांची त्यांच्याविरुद्ध मातोश्रीकडे कांगाळ्या करण्याची हिंमत झाली नाही. ज्यांनी तसा प्रयत्न केला त्यांना त्यांनी थेट शिवसेनेबाहेरचा रस्ता दाखविला.

विरोधकांतील बेकी औटींना लाभदायक

शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी हे नेहमी आमदार औटींच्या विरोधातील कार्यकर्त्यांना बळ देत असतात. शिवसेनेचे निलेश लंके हे त्यापैकीच एक. त्यांना माजी आमदार अनिल राठोड, जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे, संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर यांच्यापासून अनेकांनी मदत केली. त्यातून लंकेंनी औटींना आव्हान दिले. मात्र मातोश्रीने लंके यांना शिवसेनेबाहेर काढले. असे असले तरी औटींना राजकारणात लंके यांची डोकेदु:खी आहे. औटींच्या विरोधकांमध्ये एकीचा अभाव आहे. त्यांच्यात एकमत होत नाही. एकमेकांविरुद्धच ते लढतात. त्यामुळे औटींची राजकीय वाटचाल नेहमीच सुकर होत राहिली आहे.