‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेला पोलीस विभाग गुन्हेगारीच्या समुळ उच्चाटनासाठी सदैव तत्पर आहे. परंतु त्यासाठी प्रसारमाध्यमे आणि समाजाचे पाठबळ मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पोलीसही कोणतीही घटना छोटी-मोठी न मानता होणाऱ्या अनर्थाला वेळीच आळा घालण्यासाठी सदैव तत्पर राहतील, असा विश्वास कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलीस प्रमुख मनोजकुमार शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. पुढील काळात दर १५ दिवसाला तालुक्यातील एका पोलीस ठाण्याला भेट देऊन हा उपक्रम राबविला जाईल असेही त्यांनी सांगितले.
इचलकरंजी शहर व परिसरातील नागरिकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख मनोजकुमार शर्मा हे बुधवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जनता दरबार घेण्यासाठी आले होते. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी जनता दरबार घेण्याची शहरातील ही पहिलीच घटना आहे.
ते म्हणाले, पोलीससुध्दा हा समाजाचाच एक घटक आहे. पण काहींच्या वाईट वागण्यांमुळे संपूर्ण पोलीस क्षेत्र बदनाम होत आहे. पोलीस आणि नागरिक यांच्यात निर्माण झालेला दुरावा दूर करण्यासाठी पोलीस खात्यामार्फत तक्रारी व त्यांच्या निपटारा तातडीने व्हावा यासाठी जिल्ह्यात विविध तालुक्यांत जनता दरबार भरविण्यात येणार आहे. एखादी किरकोळ बाबसुध्दा भविष्यात मोठय़ा घटनेसाठी कारण बनू शकते. त्यामुळे किरकोळ म्हणून एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता त्याला वेळीच आळा घालावा यासाठी पोलीस सदैव प्रयत्नशील राहतील. शहर व परिसरातील वाढती गुन्हेगारी ही चिंताजनक असून त्याच्या समुळ उच्चाटनासाठी पोलीस कर्तव्यदक्ष आहेतच. पण त्यासाठी समाजाच्याही सहकार्याची गरज आहे. नागरिकांना वैयक्तिक अथवा सामाजिक स्वरूपाच्या तसेच पोलिसांबद्दल असलेल्या तक्रारी मनमोकळेपणाने मांडता याव्यात यासाठीच हा जनता दरबार भरविण्यामागचा उद्देश आहे.
आंदोलन कोणतेही असो त्यामध्ये काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमुळे आंदोलनाला वेगळे वळण लागते. शिवाय पोलिसांकडून एखादी तत्काळ कारवाई करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला अमानुषता म्हणून पोलिसांना टाग्रेट केले जाते. म्हणून हे सर्व टाळून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांना समाजाच्या सहकार्याची गरज असल्याचे ते म्हणाले. शहरातील वाहतुकीची समस्याही जटील बनत चालली असून नगरपालिकेच्या सहकार्याने ती दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यासाठी आवश्यक त्या सूचनांचे आम्ही स्वागतच करू असेही त्यांनी सांगितले.
शहरातील शहापूर पोलीस ठाण्यासाठी मंजुरी मिळाली असून सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत एस्टिमेट बनविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळेच नजीकच्या काळात त्या ठिकाणी पोलीस ठाणे सुरू होईल असे त्यांनी सांगितले. पोलिसांच्यावर चोहोबाजूंनी वाढता ताण आहे. त्याचबरोबर गुंडगिरीला मिळणाऱ्या पाठबळामुळे कारवाई करण्यात अडचणी येत असल्याने कायदा मात्र कमजोर बनत चालला आहे. आणि त्याचाच फायदा घेत गुंडगिरी फोफावत चालली आहे. त्यामुळे प्रत्येक १५ दिवसांनी जनता दरबार भरवून त्यामध्ये येणाऱ्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन त्यांचा निपटारा करण्याबरोबरच पोलीस आणि समाज यांच्यातील दुरावा दूर करून समन्वय साधण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही शर्मा यांनी सांगितले.