नितीन गडकरी यांच्या सलग चार विजयामुळे सर्वपरिचित झालेल्या नागपूर पदवीधर संघाची येती निवडणूक गडकरींच्या अनुपस्थितीतही बहुचर्चित ठरण्याची चिन्हे आहेत. स्वत: गडकरी उमेदवार नसल्यामुळे ही जागा राखण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर आहे.
पदवीधर मतदारसंघातून निवडून गेलेल्या उमेदवाराची मुदत पुढील वर्षीच्या १९ जुलैपर्यंत असल्याने जून २०१४ पर्यंत या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण व्हावी लागणार आहे. त्यासाठी मतदार नोंदणीची मुदत १५ नोव्हेंबपर्यंत आहे. गेल्या वर्षी या मतदारसंघात १ लाख, ८३ हजार मतदार होते.  दरवेळी नव्याने नोंदणी करावी लागत असल्याने गेल्या निवडणुकीपर्यंत अस्थायी असलेला मतदारसंघ यावेळेपासून कायम होणार, हे त्याचे वैशिष्टय़ आहे. संभाव्य उमेदवारांनी मतदार नोंदणीत स्वारस्य घेतल्याने यावेळी मतदारांची संख्या २.२० लाख ते अडीच लाखापर्यंत जाऊ शकेल असा अंदाज आहे.
भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे जाळे आणि स्वत:चे संघटन कौशल्य या बळावर नितीन गडकरी हे चार वेळा पदवीधर मतदारसंघातून निवडून आले. कुठलाही विरोधी उमेदवार त्यांच्यासमोर फार तग धरू शकला नाही. मात्र, यंदा गडकरी यांनी नागपुरातून लोकसभा निवडणूक लढण्याची जय्यत तयारी केली आहे. त्यांची उमेदवारी नसल्यामुळे आतापर्यंत भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या पदवीधर मतदारसंघाची समीकरणे बदलली आहेत. काँग्रेसने आपला उमेदवार आधीच जाहीर करून मतदारांच्या नोंदणीसाठीही पुरेशी मेहनत घेतली आहे. माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये हेही येथून लढण्यास इच्छुक असल्यामुळे त्यांचा तिसरा कोन या निवडणुकीला लाभणार आहे.
भाजपने अद्याप आपला उमेदवार का जाहीर केला नाही याचे अनेकांना कोडे पडले आहे. अद्याप उमेदवार जाहीर न करणे ही बाब पक्षासाठी नुकसानदायक ठरत आहे. उमेदवार नितीन गडकरी यांच्या पसंतीचाच राहील हे स्पष्ट  आहे. गडकरींनी आपला पत्ता राखून ठेवला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आपला उत्तराधिकारी ते विचारपूर्वक निवडणार असल्याचे  दिसून येत आहे. महापौर अनिल सोले यांचे नाव जवळजवळ निश्चित झाले असून, ते लवकरच जाहीर होईल, असे पक्षाच्या वर्तुळातून सांगण्यात येते. त्यामागोमाग गिरीश व्यास, संदीप जोशी व गिरीश देशमुख यांचीही नावे चर्चेत आहेत. काही वजनदार नेत्यांना गिरीश देशमुख चालत नाहीत, तर संदीप जोशी उमेदवार राहिल्यास ही निवडणूक भाजप हरणार असेही अनेकांचे मत आहे.
काँग्रेसचे उमेदवार बबन तायवाडे हे गेल्या निवडणुकीत सुमारे ५० हजार मतांनी पराभूत झाले असले, तरी यावेळी गडकरी विरोधात नसणे हा त्यांच्यासाठी ‘प्लस पॉइंट’ आहे. काँग्रेसच्या नेत्यांचे त्यांच्या शिक्षण संस्थांमार्फत असलेले जाळे लक्षात घेता त्यांना मतदार नोंदणीसाठी लोकांना कामाला लावणे सहज शक्य आहे. स्वत: तायवाडे यांचाही चांगला संपर्क आहे.
 किशोर गजभिये यांची उमेदवारीही दखलपात्र ठरणार आहे. कारण दलित मतदारांची संख्या मोठी आहे आणि गजभिये यांचा लौकिक हुशार अधिकारी म्हणून राहिला आहे.
भाजप गडकरींवर अवलंबून
गडकरी हे उमेदवार नसल्यामुळे भाजपला निवडणूक कठीण झाली आहे. नितीन गडकरी यांचे चाहते सर्वच पक्षांमध्ये असल्यामुळे यापूर्वी भाजपची नसलेली मतेही त्यांना पडत. आता मात्र तसा करिष्मा असलेला कुणी उमेदवार भाजपकडे नाही. गडकरींनी आपली संपूर्ण शक्ती पक्षाच्या उमेदवारामागे उभी केल्याशिवाय त्याला निवडून येणे कठीण आहे, परंतु ते स्वत: लोकसभा निवडणुकीच्या तयारीत व्यग्र राहणार असल्याने तसे होणे अवघड आहे.