कर्जमाफीच्या मुद्द्यावरून पहिल्या दिवसापासून आक्रमक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी शुक्रवारी विधानसभेमध्ये घोषणाबाजी करीत कागदाचे तुकडे फेकले. त्यांच्या या कृतीला तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी तीव्र विरोध करीत पुन्हा सभागृहात कचरा केला तर सभागृहाबाहेर घालविण्यात येईल, असा इशारा विरोधकांना दिला. त्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले.
शुक्रवारी कामकाज सुरू होण्यापूर्वीच विरोधकांनी विधीमंडळाबाहेर घोषणाबाजी करीत शेतकऱ्यांना कर्जमाफीची मागणी लावून धरली. त्यांनी सभागृहात येऊनही हाच मुद्दा लावला. प्रश्नोत्तराचा तास संपत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी व्हेलमध्ये जमून कागदाचे तुकडे फेकण्यास सुरुवात केली. यावेळी तालिका अध्यक्ष योगश सागर यांनी विरोधकांना सभागृहात कचरा न करण्याची सूचना केली. सभागृहात कोणी कचरा केला तर त्याला सभागृहातून बाहेर काढण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. यामुळे विरोधक संतप्त झाले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे सभागृहात आल्यावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित करीत योगेश सागर यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. तुम्ही विरोधी पक्षात असताना सभागृहात गोंधळ घातला होता. त्यावेळी आम्ही कधी अशी कारवाई करण्याचा इशारा दिला नव्हता, याकडे विखे-पाटील यांनी लक्ष वेधले. त्यांच्या या मागणीनंतर सत्ताधारी सदस्य संतप्त झाले आणि त्यांनी विरोधकांच्या विरोधात घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. अखेर योगेश सागर यांचा तो इशारा आणि विखे-पाटील यांचे प्रत्युत्तर कामाकाजातून वगळण्याचा निर्णय अध्यक्षांनी दिला. त्यावर विरोधकांचे समाधान न झाल्याने त्यांनी सभात्याग करण्याचा निर्णय घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confrontation between opposition ruling party members
First published on: 11-12-2015 at 11:55 IST