प्रशांत देशमुख

इतर विद्याशाखांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेण्याबाबत संभ्रम  कायम असून वैद्यक परिषदेच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे महाराष्ट्रात उच्च व तंत्रशिक्षणाच्या पदवीपूर्व परीक्षा रद्द झाल्या आहेत. आता अंतिम वर्षांची परीक्षासुद्धा रद्द करण्याची भूमिका पुढे आली आहे. मात्र वैद्यकीय शिक्षण खात्याने या संदर्भात निर्णय घेतलेला नाही. अ‍ॅलोपॅथीच्या भारतीय वैद्यक परिषदेप्रमाणेच आयुषच्या म्हणजेच आयुर्वेद, होमिओपॅथी व अन्य शाखांसाठी केंद्रीय पातळीवर परिषदा आहेत. त्यांच्याकडे या संदर्भात मार्गदर्शन मागण्यात आले आहे.

मे ते जूनदरम्यान वैद्यकीय शाखेच्या परीक्षा होत असतात. त्यानुसार वैद्यकीय महाविद्यालयांनी तयारी ठेवली. पण, करोना संकटामुळे परीक्षा होतील की नाही, याविषयी शंका आहे.

या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते वैद्यकीय शिक्षण कायद्यानुसार परीक्षा अटळच आहे. त्या केवळ पुढे ढकलल्या जाऊ शकतात. परीक्षा घेण्याचे अधिकार असणाऱ्या वैद्यकीय अभिमत विद्यापीठातदेखील संभ्रमच आहे. सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजीव बोरले म्हणाले की, आम्ही सर्व अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरूंनी वैद्यक परिषदेकडे मार्गदर्शन मागितले आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थी गावी गेले आहे. ते आल्यानंतर विलगीकरणाची प्रक्रिया पूर्ण करणे आहेच. ऑनलाइन परीक्षेचा पर्याय सरसकट शक्य नाही. परीक्षेपूर्वी एक महिन्याचा कालावधी द्यावाच लागणार असल्याचे डॉ. बोरले म्हणाले.

नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर म्हणाले की, वैद्यकीयसोबतच आयुर्वेद व अन्य शाखांच्या केंद्रीय परिषदांकडे याबाबत मार्गदर्शन मागण्यात आले आहे. परीक्षा होणारच. राज्यातील सर्व अधिष्ठात्यांच्या मी संपर्कात आहे. केंद्रीय परिषदेकडून निर्णय आल्यानंतर त्याची अंमलबजावणी होईल. या महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात याबाबत निर्णय लागेल.