07 June 2020

News Flash

बालिश, दळभद्री, नाकर्ते राज्य सरकार!’

राज्यात शेतक-यांना कर्जमाफी मिळावी अशी मागणी करतानाच जिल्हा काँग्रेसच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या निषेध मोर्चात राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात आली.

| July 10, 2015 03:15 am

राज्यात शेतक-यांना कर्जमाफी मिळावी अशी मागणी करतानाच जिल्हा काँग्रेसच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या निषेध मोर्चात राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीच राज्य सरकारला बालिश, दळभद्री, नाकर्ते अशा शेलक्या भाषेत दूषणे दिली.
शेती व शेतक-यांच्या प्रश्नांवर राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने गुरुवारी नगरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. पक्षाच्या जिल्हय़ातील या दोन्ही प्रमुख नेत्यांसह आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार भाऊसाहेब कांबळे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी खासदार दादा पाटील शेळके, जिल्हा परिषदेच्या सभापती मीरा चकोर, विनायक देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण आदी या मोर्चात सहभागी झाले होते. जुन्या बसस्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ास अभिवादन करून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना या वेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत सर्वच वक्त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. विखे यांनी राज्य सरकारला दळभद्री व नाकर्ते अशी दूषणे दिली. थोरात यांनी राज्य सरकारचा ‘बालिश सरकार’ असा उल्लेख केला. थोरात म्हणाले, जनतेची दिशाभूल करून भारतीय जनता पक्षाने केंद्र व राज्यातील सत्ता हस्तगत केली आहे. जनतेला खोटी स्वप्ने दाखवली, काँग्रेसवर खोटेनाटे आरोप या मंडळींनी केले, मात्र या दोन्ही सरकारचा बनावटपणाच सर्वासमोर आला आहे. राज्यातील सरकार जनेतेचे हित पाहणारे नाही. हीच गोष्ट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवली पाहिजे. राज्य सरकारडून कोणतेही निर्णय होत नाहीत. या सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी भरडला जात आहे. मदतीच्या केवळ घोषणाच झाल्या, प्रत्यक्षात शेतक-यांपर्यंत ही मदत पोहोचलीच नाही. राज्यात दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर आहे, मात्र राज्य सरकारला त्याची जाणीव नाही. शेती व शेतक-यांचे प्रश्नच त्यांना समजत नाहीत, त्यामुळे शेतक-यांच्या दु:खाची जाणीवही त्यांना नाही. शेतक-यांविषयीची त्यांची भूमिका लक्षात घेता, कर्जमाफी खेचून आणावी लागेल. त्यासाठी कार्यकर्त्यांनी संघर्षांला सज्ज व्हावे, असे आवाहन थोरात यांनी केले.
डॉ. तांबे, आमदार कांबळे, ससाणे, देशमुख, मीरा चकोर, हेमंत ओगले, अनुराधा नागवडे, अण्णासाहेब म्हस्के यांची या वेळी भाषणे झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2015 3:15 am

Web Title: congress criticises bjp
टॅग Bjp,Congress,Criticises
Next Stories
1 गुन्हेगार नितीन स्वामी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार
2 निरीक्षकाचे वाहन जाळून घराची नासधूस; पोलिसांचा हवेत गोळीबार
3 तटस्थ मतदारांवर उमेदवारांची मदार!
Just Now!
X