News Flash

“विरोधकांना कोडगे-निर्लज्ज म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषेबाबत बोलणं म्हणजे…”

काँग्रेस नेत्याची जोरदार टीका

संग्रहित (PTI)

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं. महाराष्ट्रातील सरकार स्थापनेच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’च्या माध्यमातून अभिनंदन मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केले. या मुलाखतीचा मूळ हेतू राज्यातील विरोधकांना धमकावण्याचाच आहे, असा आरोप भाजपाच्या नेत्यांकडून केला जात आहे. तशातच माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबईत पत्रकारांशी बोलताना एक इशारा दिला होता. त्यानंतर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

“साम-दाम-दंड-भेदाची भाषा करणारे, शेतकरी सुकाणू समितीला जीवाणू समिती, आंदोलकांना देशद्रोही म्हणणारे , विरोधकांना कोडगे -निर्लज्ज म्हणणारे ईसीएफ विरोधी पक्षाची दलाल म्हणून संभावना करणारे देवेंद्र फडणवीस हे आता मुख्यमंत्र्यांची भाषा अशोभनीय आहे असे म्हणतात. आश्चर्य आहे,” असं म्हणत सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून हल्लाबोल केला.

काय म्हणाले होते फडणवीस?

“महाविकास आघाडीचं सरकार हे सगळ्या बाबतीत अपयशी ठरलेलं आहे. राज्याच्या इतिहासात धमकावणारे मुख्यमंत्री कधीही पाहिलेले नाहीत. याच्यामागे हात धुवून लागू, त्याची खिचडी करू, याचा खिमा करू अशी भांडणं नाक्यावर होतात. असं बोलणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. कारण चिरडण्याची भाषा करणारे मुख्यमंत्री हे महाराष्ट्रात फार काळ टिकलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी शब्द संयमाने आणि जपून वापरावे”, असा इशारा फडणवीसांनी दिला.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री या पदाचा मान राखायला हवा. त्यांना माझा सल्ला आहे की मुख्यमंत्र्यांसारखे वागा. पदाला साजेसा संयम ठेवा आणि तो तुमच्या कृतीतून दिसू द्या. मुख्यमंत्र्यांची मुलाखतीत विकासावर चर्चा झालीच नाही. संपूर्ण मुलाखत टीका टिपण्णीमध्ये गेली. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला शोभणारी ती वक्तव्यं नव्हती. माझं असं प्रामाणिक मत आहे की उद्धव ठाकरे यांनी पाच वर्ष नक्की राज्य चालवावे पण नुसत्या धमक्या नकोत. त्यापेक्षा कायदा सुव्यवस्थेचं राज्य आणा”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 2:48 pm

Web Title: congress leader sachin sawant criticize bjp devendra fadnavis cm uddhav thackeray saamna interview jud 87
Next Stories
1 फडणवीसांनीही मुख्यमंत्री असताना धमकीची भाषा वापरली होतीच-संजय राऊत
2 “कंगना राणौत, अर्णब गोस्वामींच्या सगळ्या विचारांशी आम्ही सहमत नाही, पण…”
3 प्रसाद लाड म्हणाले, “ही तर पोकळ आश्वासनांची वचनपूर्ती…”
Just Now!
X