आघाडीच्या काळात काँग्रेसमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे गणित बिघडले, अशा आशयाचे विधान करणारे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांना काँग्रेसने पक्ष चालविण्यासाठी दुसऱ्याची कुबडी न घेण्याचा सल्ला दिला आहे. राष्ट्रवादीला वाढविण्याची जबाबदारी आमची नसल्याचे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रफुल पटेलांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. आघाडीच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी दोघांनाही समान फायदा-तोटा झाला आहे. जे त्यांनी सोसले तेच आम्हालाही सोसावे लागले, असे चव्हाणांनी यावेळी म्हटले.
काँग्रेस पक्षानेच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावले. गेल्या पाच वर्षांत काँग्रेसबरोबर राहिल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक नुकसान झाले, अशी जोरदार टीका प्रफुल्ल पटेल यांनी सोमवार केली होती. यावेळी पटेलांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधत यांच्यासारख्या नेत्यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम केल्याचे म्हटले होते. चव्हाण यांनीच राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवले, असा आरोप पटेल यांनी केला होता. देशातील आणि राज्यातील काँग्रेसचे वर्चस्व संपले आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस स्वत:ही बुडाली आणि आम्हालाही घेऊन बुडाली. मात्र, आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस नव्याने भरारी घेईल, असा आशावाद अकोल्यातील कार्यक्रमात प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला होता.
यापूर्वी पटेलांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेवर काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी राष्ट्रवादी मोदी सरकारची मर्जी सांभाळत असल्याचे म्हटले होते. मोदी सरकारला खूश करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते काँग्रेस विरोधात अपप्रचार करत असल्याचे सावंत यांनी म्हटले होते.