|| दिगंबर शिंदे

भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यात चुरस

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक १ ऑगस्ट रोजी होणार आहे. गेल्या तीन निवडणुकांमध्ये असलेले बहुतांश चेहरे या वेळीही मदानात उतरणार असले तरी यावेळच्या निवडणुकीमध्ये एक बदल प्रामुख्याने जाणवतो आहे तो म्हणजे भाजपसारखा राष्ट्रीय पक्ष सत्तेचा प्रमुख दावेदार म्हणून लोकांसमोर जात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील सत्तेसाठीची पारंपरिक सुंदोपसुंदी या वेळी दिसणार नाही, असे संकेत मिळत आहेत. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी हे पारंपरिक विरोधक एका मांडीला मांडी लावून बसण्यासाठी पंगत पडायचीच वाट पाहत आहेत.

महापालिकेवर आतापर्यत काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मागील निवडणुकीमध्ये जरी विकास महाआघाडीचा प्रयोग केला असला तरी या आघाडीला एकमुखी म्हणता येईल असा कारभार केवळ साडेतीन वर्षांचाच मिळाला. अखेरची दीड वष्रे आपसातील राजकीय कुरघोडीत गेली. काँग्रेसला या वेळी पूर्ण पाच वष्रे सत्ता राखता आली असली तरी पक्षांतर्गत बेदिलीतून स्थायी समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात एक वर्ष देण्यात आली.

महापालिकेच्या मावळत्या सभागृहात काँग्रेसचे ४१ आणि सहयोगी एक असे ४२ सदस्यांचे संख्याबळ आहे, तर राष्ट्रवादीकडे १९ अधिक सहयोगी सहा तर स्वाभिमानी विकास आघाडीकडे ११ अधिक सहयोगी दोन असे १३ सदस्य आहेत. बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये सभागृहामध्ये विरोधक कोण आणि सत्ताधारी कोण असा प्रश्न पडावा अशीच राजकीय स्थिती पाहण्यास मिळाली. उपमहापौर विजय घाडगे यांनी शिवसेनेत प्रविष्ट झालेल्या शेखर माने यांच्या साथीने सत्ताधारी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना खिंडीत पकडण्याची एकही संधी सोडली नाही.

महापालिकेत सत्ताबदलासाठी काहीही करण्याची भाजपची तयारी असून, अगदी ऐन वेळी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तंबूतून भाजपावासीय होण्याची तयारी असलेल्यांना खुले आमंत्रण भाजपने दिले आहे. मात्र, बदलत्या राजकीय वातावरणामुळे भाजपच्या वाटेवर असलेली अनेक मंडळी पुन्हा स्वगृहीच विसावल्याने मोठय़ा प्रमाणात भाजपमध्ये आयारामांची आवक होईल असे वाटत असतानाच भाजपचे मनसुबे उधळले गेले आहेत.

मिरज शहरातील काँग्रेसचे चार नगरसेवक, तीन माजी नगरसेवक वगळता अन्य ठिकाणी भाजपमध्ये घाउक आवक झालेली नाही. ही आयात मिरजचे आमदार सुरेश खाडे यांनी हट्टाने करवून घेतली असली तरी याचा फायदा किती आणि तोटा किती हे आता उमेदवारी दाखल करण्याच्या वेळी दिसून येणार आहे. कारण या आयारामांना उमेदवारी देण्यास खुद्द भाजपअंतर्गतच तीव्र विरोध होत असून, बंडाळी माजण्याचीच चिन्हे दिसत आहेत. याचा फटका पारंपरिक मतदानावरही होण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपमध्ये प्रवेश घेत असताना येणाऱ्यांनी सोयीची उमेदवारी निश्चित करूनच प्रवेश केला आहे. यामुळे त्यांना डावलून निर्णय घेतला तर सगळेच मुसळ केरात जाण्याचा धोकाही तितकाच आहे.

मिरज संघर्ष समितीच्या माध्यमातून माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी सत्तेच्या गणितात जवळीक साधण्याचा प्रस्ताव मात्र भाजपने नाकारला असून यामुळेही आणखी काही जणांचा पडद्याबाहेर राहून मदत करण्याचा प्रयत्न रोखल्याने भाजपला आता सावध भूमिका घ्यावी लागत आहे. प्रारंभीच्या काळात भाजपकडे वाटत होता तेवढा ओढा सध्या दिसत नाही.

दुसऱ्या बाजूला आमदार जयंत पाटील यांनी काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी हात पुढे केला आहे. दोन्ही काँग्रेसची आघाडीची तयारी असून जागावाटपाबाबत प्राथमिक बोलणीही सुरू झाली आहे. राष्ट्रवादीने निम्म्या जागांची मागणी केली आहे तर काँग्रेसने मागील सभागृहात जेवढय़ा जागा आहेत त्या प्रमाणात जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. हा जागा वाटपाचा तिढा येत्या चार दिवसांत सुटेल आणि ४३ जागा काँग्रेसला तर ३३ जागा राष्ट्रवादीला असे सूत्र मान्य होण्याची शक्यता आहे. उर्वरित जागा समविचारी पक्षाला सोडल्या जाण्याची चिन्हे आहेत.

भाजपने शिवसेनेला सोबत घेण्याची तयारी दर्शवली असली तरी शिवसेनेने अद्याप अनुकूल प्रतिसाद दिलेला नाही. याचे अनुकूल परिणाम होतात की प्रतिकूल हे उमेदवारीवरूनच स्पष्ट होणार आहे. शिवसेनेची ताकद ही विभागलेली आहे. यामुळे याचा जर दोन्ही पक्ष एकमेकासमोर उभे ठाकले तर एकत्रित काँग्रेस-राष्ट्रवादीला लाभदायी ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

नव्याने महापालिका निवडणुकीला सामोरे जात असताना शहराचे प्रश्न गेल्या दोन दशकात कितपत सुटले याचा जर कानोसा घेतला तर फारसे काही आशादायी चित्र पाहायला मिळत नाही. जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन सत्ताधारी काँग्रेसने मोठा गाजावाजा करून आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केले असले तरी ते पूर्ण क्षमतेने चालविले जात आहे का, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

काँग्रेसकडे कणखर नेतृत्वाचा अभाव

महापालिकेची सत्ता असलेल्या काँग्रेसला यंदा प्रथमच कणखर नेतृत्वाचा अभाव जाणवत असून, पक्षाची ताकद असली तरी धडाडीचे नेतृत्व दिसत नाही. डॉ. पतंगराव कदम, मदन पाटील यांच्यानंतर एकमुखी नेतृत्व मान्य करण्यासारखी स्थिती आज दिसत नाही. यामुळेच सामूहिक नेतृत्वाची तयारी सुरू आहे. मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील, आ. विश्वजित कदम, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदी मंडळी नेतृत्वाच्या फळीत असले तरी त्यांची उमेदवारी वाटपातच कसोटी लागणार आहे.