एकीकडे “मुंबईतील करोना मृत्यूंची अचूक आकडेवारी न देता चाचण्यांबाबतही तडजोडी करून, करोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करण्यात येत आहे.”, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. तर दुसरीकडे, राज्यातील करोना परिस्थिती, रेमडेसिविर, प्राणवायू आणि लसींच्या तुटपुंज्या पुरवठ्यावरून राज्य सरकारकडून सातत्याने केंद्रावर टीका केली जात असतानाच दुसरीकडे राज्याच्या करोनाविरोधातील लढ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कौतुक केल्याचे समोर आले आहे. शिवाय, मुंबई महापालिकेच्या करोना व्यवस्थापनाचं सर्वोच्च न्यायालयापाठोपाठ केंद्र सरकारच्या नीती आयोगानेही कौतुक केलं आहे. यावरून आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

“करोना आकड्यांची बनवाबनवी तत्काळ थांबवा ; जनतेची दिशाभूल नको!”

“फडणवीस साहेबांना पंतप्रधानांबरोबरच नीती आयोगाचे प्रमुख अमिताभ कांत यांच्याकडूनही अगदी घरचा मोठा आहेर मिळाला आहे! महत्वाचे म्हणजे हा आहेर आभासी नाही, खराखुरा आहे.” असं सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. शिवाय, त्यांनी नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी मुंबई मनपाचं कौतुक केलेलं ट्विट देखील सोबत जोडलं आहे.

करोनाविरोधातील राज्याच्या लढ्याचे पंतप्रधानांकडून कौतुक

तर, “केंद्रीय पद्धतीने बेडचं वाटप करणं, ऑक्सिजन साठवणुकीच्या सुविधांचा अंदाज घेणं, इतकंच नाही तर खासगी रुग्णालयातील बेडचंही वाटप करणं आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी डॅशबोर्ड तयार करणं, रुग्णांच्या तब्येतीबद्दल पाठपुरावा करण्यासाठी वॉर रुम निर्माण करणं. मुंबईचं करोना व्यवस्थापन मॉडेल प्रेरणादायी आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि त्यांच्या ग्रेट टीमचं अभिनंदन,” अशा शब्दात नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी मुंबई महापालिका आणि आयुक्तांचं कौतुक केलं आहे.

करोना व्यवस्थापनाचं ‘मुंबई मॉडेल’ प्रेरणादायी; नीती आयोगाकडून महापालिकेचं कौतुक

सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले होते?
दिल्लीतील ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मुंबईतील करोना व्यवस्थापन मॉडेलचा दाखला दिला होता. न्या. चंद्रचूड आणि न्या. एम. आर. शाह यांच्या दोन सदस्यीय खंठपीठासमोर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने करोना व्यवस्थापनासंदर्भात मुंबई महापालिकेनं तयार केलेलं मॉडेल देश आणि राज्यस्तरावर शक्य आहे का?, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली होती.

“भाजपाने पोटदुखीचा इलाज करावा व भाजपाशासित राज्यांच्या खोट्या आकडेवारीकडे लक्ष द्यावे”

या अगोदर देखील सचिन सावंत यांनी वेळोवेळी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलेला आहे. “मुंबईची वाखाणणी सर्वोच्च न्यायालयाने केली याचा फडणवीसांना खरं तर आनंद वाटायला हवा होता. पण त्याची पोटदुखी व्हावी ही अपेक्षा नव्हती, असो! खोट्या आकडेवारीचा मसीहा असलेल्या भाजपाचे सर्व मुख्यमंत्री आपल्या राज्यांमध्ये आकडे दडवतात व फडणवीस इथे चिंता व्यक्त करतात हे आश्चर्याचे आहे.” असं  देखील सचिन सावंत म्हणालेले आहेत.