“आज घडीला या देशावर ९३ लाख कोटींचे कर्ज आहे. देश पूर्णत: कर्जाच्या दरीत लोटला जात आहे. २०१४ पर्यंत ४६ लाख कोटी कर्ज होते. मार्च २०२० मध्ये कर्ज ९३ लाख कोटीच्या घरात गेले आहे. करोनामुळे अर्थकारण पूर्णत: ठप्प् झाले आहे. त्याचा परिणाम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार टाळी आणि थाळी शिवाय काही देऊ शकले नाही, असं म्हणत आपत्ती व्यवस्थापन, मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

विशेष म्हणजे केंद्र सरकार आपत्ती व्यवस्थापनसाठी निधी देऊ शकले नाही. रिझर्व्ह बँकेचा सेस निधी यापूर्वीच खर्च केला गेला आहे. अशा भयानक आर्थिक स्थितीत राज्य स्वत:च्या आपत्ती व्यवस्थापनावर लक्ष्य ठेवून असल्याचेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. करोना व्हायरसमुळे राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीबाबत त्यांनी सर्वांशी संवाद साधला.

मजूरांना २५ किलो धान्य मोफत
येत्या ३१ मार्च पर्यंत सर्व बंद असल्याने मजुरांच्या मजुरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तेव्हा अशा स्थितीत राज्य शासनाने मजुरांना २५ किलो धान्य देणार मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे वितरण लवकरच सुरू होणार आहे. स्थानिक मजुरांसोबतच परप्रांतीय मजुरांनादेखील २५ किलो मोफत धान्य मिळणार आहे, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.