|| कल्पेश भोईर

दूषित किनारे, बंदी कालावधीतील मासेमारी, बोटींची वाढती संख्या, तेल सर्वेक्षणाने बेजार

२१ नोव्हेंबर  जागतिक मच्छीमार दिन :- वसई : मागील काही वर्षांपासून सातत्याने बदलणारे निसर्गचक्र, दूषित समुद्रकिनारे, मासेमारी बोटींची वाढती संख्या, बंदी कालावधीत होणारी बेसुमार मासेमारी, तेलसर्वेक्षण, मासळी दरात होणारी कपात विविध प्रकारच्या अडचणी मच्छिमारांच्या समोर एकापाठोपाठ एक उभ्या राहू लागल्या आहेत. या अडचणीत घट होण्याऐवजी त्यामध्ये दिवसागणिक भर पडत असल्याने मच्छिमारांनी   चिंता व्यक्त केली आहे.

वसई-विरार, मीरा-भाईंदर , यासह पालघर या किनारपट्टीवर राहणारे बहुतांश नागरिक पारंपारिक  मच्छिमारीचा व्यवसाय करीत आहेत. त्यांनी मासेमारी करून आणलेल्या मासळीला बाजारपेठेत मोठी मागणी असते बहुतांश मालाची निर्यातही होत असते.  सातत्याने पडणारा मासळी दुष्काळ, साहित्यांच्या किंमतीत होणारी वाढ, इंधनाची दरवाढ यामुळे मच्छीमार जेरीस आलेला आहे. रोजचा खर्च भागविण्याऐवढीही मासळी त्याच्या जाळ्यात अडकत नाही.  त्यातच शासकीय स्तरावरूनही मच्छिमारांना योग्य तो मोबदला दिला जात नाही. आजही शासनाने असंख्य मच्छिमार बांधवांना देण्यात येणारा डिझेलचा परतावा दिलेला नाही,  तर दुसरीकडे  जास्त मासे  मिळावे या लालसेपोटी  विविध ठिकाणच्या भागातील खोल समुद्रात  बेकायदा केल्या जाणाऱ्या मासेमारीचा परिणाम  पारंपारिक मच्छिमारांवर होऊ लागला आहे. या व्यवसायात भांडवलदारही शिरकाव करू लागल्याने पारंपारिक मासेमारी करणाऱ्यांच्या व्यवसायावर गदा येऊ लागली आहे. तर यंदाच्या वर्षी मासळीच्या दरातही कमालीची कपात झाली आहे. पापलेट आणि सुरमई या निर्यात होणाऱ्या महत्वाच्या मासळीच्या दरात प्रत्येक किलो मागे जवळपास २०० ते २५० रुपये इतकी घट झाली असल्याने आतापर्यंत साधारपणे प्रत्येक बोटीला जवळपास १२ ते १३ लाखांचे नुकसान सहन करावे लागले आहे, अशा स्थितीत पारंपारिक मच्छिमारांनी जगायचे तरी कसे असा प्रश्न उपस्थित केला आहे.

माश्यांचे साठे संपुष्टात येण्याची भीती.

एलईडीच्या पर्सेसिन जाळे  या पद्धतीने बेकायदेशीर केल्या जाणाऱ्या मासेमारीत  छोट्या-मोठ्या प्रजाती एकदाच जाळ्यात अडकत असल्याने माश्यांची प्रजाती या कमी होऊ  लागल्या आहेत. यामुळे भविष्यात हे माश्यांचे साठे संपुष्टात येतील. याआधी सरासरी ४.५० लाख मॅट्रिक टन इतके राज्य शासनाचे उत्पादन निघत होते. परंतु मागील वर्षी केवळ १.५० मॅट्रिक टन इतकेच उत्पादन झाले. यामुळे माश्यांची आवकही कमालीची घटली असल्याचे अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी सांगितले आहे.

जागतिक मच्छिमार दिन साधेपणाने

मागील २३ वर्षांपासून २१ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मच्छिमार दिन म्हणून साजरा केला जातो . यानिमित्ताने मच्छिमार बांधव आपल्या पारंपारिक पेहरावात नटून थटून आनंदोत्सव साजरा करतात. परंतु यावर्षी करोनाचा प्रादुर्भाव असल्याने महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती यांच्यातर्फे हा दिवस साधेपणाने व सामाजिक अंतर ठेवून दि फिशरमेन्स सर्वोदय सहकारी सोसायटी अर्नाळा येथील सभागृहात साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये मच्छिमार बांधवांना भेडसावत असलेल्या समस्या, यासह इतर महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे.