सुहास बिऱ्हाडे

आर्थिक गुन्हे शाखेचा अजब दावा, आरोपी अद्यापही फरार

वसई-विरार महापालिकेतील कर्मचाऱ्यांचा रकमेचा तसेच शासकीय निधीचा १२२ कोटींचा अपहार प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. हा घोटाळा १२२ कोटींचा नसल्याचा दावा आर्थिक गुन्हे शाखेने केला आहे. या प्रकरणातील २१ ठेकेदार अद्यापही फरार असून पालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवरही कारवाई झालेली नाही. दरम्यान, फरार ठेकेदारांनी पैसे भरण्यास सुरुवात केली असल्याने या संपूर्ण प्रकरणावर संशय निर्माण झालेला आहे.

वसई विरार महापालिकेत विविध आस्थापनांमध्ये ठेका पद्धतीने कर्मचारी भरून काम केले जाते. पालिकेतील २३ ठेकेदारांनी आपल्याकडील कर्मचाऱ्यांच्या पगारावर डल्ला मारला होता तसेच विविध शासकीय विभागांचे कर थकवले होते. याप्रकरणी २ मार्च रोजी विरार पोलीस ठाण्यात २५ ठेकेदारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र अद्यापही २५ पैकी केवळ आकाश एण्टरप्राईजेसच्या विलास चव्हाण आणि बालाजी सव्‍‌र्हिसेसच्या दिगंबर मंगरुळे या दोन ठेकेदारांना अटक करण्यात आली. उर्वरित २१ ठेकेदार अद्यापही फरार आहेत. अटक केलेल्या दोन्ही ठेकेदारांना जामीन मिळालेला नाही. जे ठेकेदार फरार आहेत, ते शहरात विविध ठिकाणी आढळून येतात, सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेतात मात्र तरी त्यांना अटक केली जात नाही. या ठेकेदारांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर १० जून रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यांना अटक करता येऊ शकत नाही, असे या प्रकरणाचा तपास करणारे आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश शेटय़े यांनी सांगितले.

एवढा मोठा घोटाळा नाही- आर्थिक गुन्हे शाखा

तक्रार मिळाल्यानंतर विरार पोलिसांनी तपास करून २३ ठेकेदारांवर १२२ कोटींचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले होते. मात्र हा संपूर्ण घोटाळा १२२ कोटींचा नसल्याचा दावा आर्थिक गुन्हे शाखेने केला आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. या ठेकेदारांनी कर्मचाऱ्यांना पूर्ण रक्कम दिलेली नसली तरी ती विविध करापोटी कापून घेतली होती. अनेकांनी कराच्या रकमा शासनाकडे भरलेल्या आहेत. त्यामुळे हा घोटाळा १२२ कोटींचा नाही असे आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश शेटय़े यांनी सांगितले.

या प्रकरणात गुन्हे दाखल झाल्यानंतर ठेकेदरांनी रकमेचा भरणा करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत तीन ठेकेदारांनी अपहार केलेल्या रकमा दंडासहित भरलेल्या आहेत. दंडाच्या रकमेमुळे त्यांना दुप्पट रकमा भराव्या लागल्या आहेत.

अधिकारी, कर्मचारी मोकाट

ठेकेदारांनी कोटय़वधी रुपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणात पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारीदेखील सहभागी असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने मान्य केले आहे. पालिकेकडून लाखो रुपयांची बिले मंजूर करून घेताना सर्व करांच्या रकमेचा भरणा झालेला आहे की नाही हे तपासणे गरजेचे होते. मात्र त्यांनी कसलीच तपासणी न करता बिले मंजूर केलेली आहेत. मात्र तीन महिने उलटूनही पालिकेच्या एकाही अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल झालेले नाहीत.

आरोपी ठेकेदारांनी पैशांचा भरणा करण्यास सुरुवात केली असली तरी त्यांच्यावर कारवाई करून दोषारोपपत्र सादर केले जाणार आहे. आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याने सध्या त्यांना अटक करता येत नाही. मात्र नियमानुसार सर्व आरोपींवर कारवाई केली जाईल

– महेश शेटय़े, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, पालघर